बडोदा : गुजरातमधील बडोदा शहरातील चोखंडी परिसरात गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. १३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता वाडा पोल परिसरात ही घटना घडली. या संपूर्ण प्रकाराचे दृश्य जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील रहिवासी बिजेंद्रसिंह वाघेला यांचे चोखंडी परिसरात ‘राजस्थान कुल्फी’ नावाचे दुकान आहे. गणेशोत्सवासाठी वर्गणी मागण्यावरून त्यांचा आणि गणेशोत्सव आयोजकांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. सुमारे २१ हजार रुपयांच्या वर्गणीवरून हा वाद वाढल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये मारामारी झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर दुसऱ्या पक्षाकडून वेगळी बाजू मांडण्यात आली आहे. जतिन पटनी यांच्या म्हणण्यानुसार, ते गेल्या २० वर्षांपासून ‘चोखंडी यूथ फेडरेशन’च्या माध्यमातून श्री गणेशमूर्तीची स्थापना करत आहेत. १३ सप्टेंबर रोजी श्री गणेशाच्या आगमनाची मिरवणूक शांततेत पार पडत असताना हा वाद निर्माण झाल्याचा त्यांचा दावा आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेची चौकशी केली जात आहे. दरम्यान, नेमका वाद कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत वाढला, याचा तपास सुरू आहे.


