ग्रामीण भाग आणि शहरातही आता २५ दिवसांत होणार एलपीजी सिल‌िंडरचे बुकिंग

बुकिंगचा ४५ दिवसांचा नियम संपुष्टात; केंद्र सरकारचा निर्णय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
ग्रामीण भाग आणि शहरातही आता २५ दिवसांत होणार एलपीजी सिल‌िंडरचे बुकिंग

नवी दिल्ली : देशभरातील घरगुती एलपीजी ग्राहकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना सिल‌िंडर रिफिल बुक करण्यासाठी समान नियम लागू करण्यात आला आहे. एक सिलिंडर बुक केल्यानंतर अवघ्या २५ दिवसांनी दुसरा सिल‌िंडर बुक करता येणार आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील ग्राहकांना दुसऱ्या सिल‌िंडरसाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी या निर्णयाची माहिती दिली. सरकारच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील एलपीजी बुकिंगमधील फरक आता पूर्णपणे दूर झाला आहे.

ग्रामीण भागातील ४५ दिवसांचा नियम रद्द

नव्या नियमानुसार देशातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना एका रिफिलनंतर पुढील सिल‌िंडर बुक करण्यासाठी किमान २५ दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. यापूर्वी शहरी भागात २५ दिवसांचा नियम लागू होता, तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ४५ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले होते. 

एलपीजी पुरवठा सुरळीत झाल्याने निर्णय

पेट्रोलियम मंत्रालयाने ७ सप्टेंबर रोजी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या प्रमुख तेल विपणन कंपन्यांना पत्र पाठवून हा बदल तातडीने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. 

मध्य-पूर्वेतील तणाव आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यावेळी मागणी नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी ग्रामीण भागात ४५ दिवसांचे बुकिंग अंतर लागू करण्यात आले होते. मात्र, आता देशातील एलपीजी पुरवठा मोठ्या प्रमाणात सुधारला असून बॅकलॉगही जवळपास संपला आहे. त्यामुळे सरकारने हा निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण ग्राहकांना मोठा फायदा

४५ दिवसांच्या प्रतीक्षेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसच्या उपलब्धतेसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या निर्णयामुळे आता देशभरातील ग्राहकांसाठी २५ दिवसांचे समान बु‌किंग अंतर लागू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोट्यवधी ग्राहकांना या निर्णयाचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा
सर्व पहा