कोइम्बतूर : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना रोज घडत असताना, तमिळनाडूतील कोइम्बतूर येथून माणुसकी आणि प्राण्यांमधील आत्मीयतेचे दर्शन घडवणारी एक थरारक घटना समोर आली आहे. एका असहाय आणि मानसिकदृष्ट्या आजारी महिलेवर मद्यधुंद अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्या निर्जन रात्री मदतीला कोणताही माणूस धावून आला नाही, तेव्हा रस्त्यावरील दोन भटक्या श्वानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता अल्पवयीनावर वर हल्ला चढवला आणि त्या पीडित महिलेचे प्राण वाचवले.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, थुडियालूर परिसरातील एनजीजीओ कॉलनीजवळ गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. पीडित महिला एका रेल्वे उड्डाणपुलाजवळ तिच्या नातेवाईकांच्या घराबाहेर बसली होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेत दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका १७ वर्षीय मुलाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. भीतीपोटी त्या असहाय महिलेने मदतीसाठी टाहो फोडला. तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकताच परिसरात फिरणाऱ्या दोन भटक्या श्वानांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.
संशयिताने श्वानांना पळवून लावण्यासाठी दगडही भिरकावले, परंतु प्राण्यांनी माघार घेतली नाही. तो मुलगा अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतानाच, एका श्वानाने पुढे होऊन त्याच्या पायाचा जोरदार चावा घेतला. या अनपेक्षित प्रतिहल्ल्यामुळे घाबरलेल्या संशयिताने तेथून पळ काढला, तर श्वानांनी काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला तिथून हाकलून लावले.
या घटनेचा उलगडा एका वेगळ्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान झाला. परिसरातील एका दुकानाला आग लावण्याच्या प्रयत्नाची तक्रार आल्यानंतर थुडियालूर पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. त्यावेळी या श्वानांच्या शौर्याचा आणि अत्याचाराच्या प्रयत्नाचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. फुटेजमधील सबळ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी गणेश नगर येथील रहिवासी असलेल्या या अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.


