युतीबाबत सरदेसाईंसोबत सकारात्मक चर्चा पण अद्याप निर्णय नाही : एम. के. शेख

काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी गोवा फॉरवर्डशी युतीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 'आप'सोबतच्या युतीचा निर्णय हायकमांड घेणार असून, सरदेसाई यांच्या चिंतांवर विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे एम. के. शेख म्हणाले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
युतीबाबत सरदेसाईंसोबत सकारात्मक चर्चा पण अद्याप निर्णय नाही : एम. के. शेख

मडगाव: गोव्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येऊ नये यासाठी मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. राज्यातील विरोधी मतांची फूट टाळण्यासाठी काँग्रेसने सर्व भाजपविरोधी पक्षांना सोबत घेण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रादेशिक पक्ष असलेल्या 'गोवा फॉरवर्ड'ने काँग्रेससोबतची युतीची बोलणी स्थगित ठेवली असतानाही काँग्रेसकडून युतीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच रणनितीचा भाग म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या बैठकीत कोणतीही थेट ऑफर देण्यात आली नसून, भाजपविरोधातील सरदेसाई यांची नेमकी भूमिका व रणनीती जाणून घेण्यावर भर देण्यात आला.

काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष एम. के. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सरदेसाई यांच्याशी विविध राजकीय मुद्द्यांवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली आहे. सर्वांनी मिळून एकत्र येत भाजपविरोधात लढा उभारण्याचा स्पष्ट संदेश काँग्रेसने सरदेसाई यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. गोवा फॉरवर्डला काँग्रेससोबत केवळ युती करायची आहे की आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची इच्छा आहे, याबाबत स्पष्टता मागण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर यावर लगेच निर्णय घेता येत नसला, तरी हा प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवला जाईल, असे शेख यांनी स्पष्ट केले. या बैठकीत सरदेसाई यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली असली, तरी वातावरण अत्यंत सौहार्दपूर्ण होते. गोवा फॉरवर्ड हा काँग्रेसचा निवडणूकपूर्व मित्रपक्ष असल्याने त्यांनी व्यक्त केलेल्या चिंतांवर काँग्रेस पक्षांतर्गत सविस्तर विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सध्यातरी गोवा फॉरवर्डकडून औपचारिक प्रस्तावाची वाट पाहिली जात आहे.

दुसऱ्या बाजूला, आम आदमी पक्षासोबत (आप) गोव्यात युती होणार की नाही, यावर बोलताना एम. के. शेख यांनी महत्त्वाचे विधान केले. दिल्ली आणि पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेस आणि 'आप' यांच्यात काही राजकीय प्रश्न अद्याप अनिर्णित असल्याने गोव्यातील 'आप'सोबतच्या युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाऊ शकत नाही. हा निर्णय पूर्णपणे काँग्रेस दिल्ली हायकमांडवर सोपवण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरील प्रादेशिक पक्षांशी चर्चा करण्याचे अधिकार प्रदेश काँग्रेसला असल्याने गोवा फॉरवर्डशी चर्चा सुरू ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, युती संदर्भात बोलताना गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत यांनी पक्षाची भूमिका मांडली. भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सांगतानाच कामत यांनी स्पष्ट केले की, युती ही परस्पर आदरावर आणि समान राजकीय हितांवर आधारित असावी. केवळ चर्चेने युती मूर्त रूपात येत नाही, तर प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचा आणि जनाधाराचा योग्य सन्मान होणे तितकेच गरजेचे आहे.

युती प्रत्यक्ष साकार होणार की सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी काँग्रेसचे प्रयत्न सुरूच आहेत. जर वरिष्ठ पातळीवर जागावाटप आणि इतर राजकीय मुद्द्यांवर एकमत झाले, तरच ही महाविकास आघाडी आकाराला येईल. अन्यथा, आगामी काळात गोव्याच्या राजकारणात त्रिकोणी किंवा बहुकोणी लढती पाहायला मिळतील. 

हेही वाचा
सर्व पहा