पणजी : सुमारे २९ महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी, दररोजची वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील धुळीचे साम्राज्य आणि स्थानिक नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागलेला प्रचंड त्रास या सर्व आव्हानांवर मात करत पर्वरीतील बहुप्रतिक्षित ६ पदरी उड्डाणपूल (Elevated Corridor) अखेर वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग-६६ वर उभारण्यात आलेल्या या ५.१५ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित भव्य सोहळ्यात होईल. या प्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) हा प्रकल्प उत्तर गोव्यातील सर्वांत व्यस्त मानल्या जाणाऱ्या महामार्गावरील दीर्घकालीन वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून उभारला आहे. राजस्थान येथील 'राजेन्द्र सिंग बाबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड' या बांधकाम संस्थेने साकारलेल्या या ५.१५ किलोमीटर लांबीच्या सहापदरी पुलामध्ये १,४३१ काँक्रीट सेगमेंट्स, ८८ भव्य पिलर्स आणि ८७ स्पॅन्सचा समावेश आहे. एप्रिल २०२४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २४ महिन्यांच्या मूळ मुदतीनुसार एप्रिल २०२६ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु पायाभरणीसाठी अधिक खोलीची आवश्यकता भासल्याने कंत्राटदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. हा उड्डाणपूल जमिनीवरील मूळ रस्त्याच्या वर उभारण्यात आल्यामुळे लांब पल्ल्याची थेट वाहतूक आता पुलावरून सुसाट धावेल, तर खालील मूळ रस्ता स्थानिक वाहतूक आणि व्यावसायिक वापरासाठी पूर्णपणे मोकळा राहील.
गेल्या २९ महिन्यांचा हा प्रवास वाहनधारक आणि स्थानिक रहिवाशांसाठी अत्यंत खडतर ठरला. महामार्गावर प्रत्यक्ष वाहतूक सुरू असतानाच पिलर उभारणे, पायलिंग करणे, रॅम्प तयार करणे आणि गर्डर बसवण्याचे अत्यंत धोकेदायक काम पूर्ण करण्यात आले. दुतर्फा असलेली दुकाने, व्यापारी आस्थापना आणि निवासी इमारतींमुळे अवजड यंत्रसामग्री ठेवण्यासाठी अत्यंत सीमित जागा उपलब्ध असणे हे कंत्राटदारासमोरील सर्वात मोठे अभियांत्रिकी आव्हान होते. हा मार्ग गोवा आणि इतर राज्यांना जोडणारा मुख्य दुवा असल्याने रस्ता पूर्णपणे बंद करणे शक्य नव्हते, त्यामुळे धावत्या वाहतुकीच्या अगदी लगत अतिशय सुरक्षिततेने हे काम पार पाडावे लागले. या काळात झालेली धूळ, वाहनांचा आवाज आणि मुख्य रस्त्यावरील बॅरिकेड्समुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम झाला होता.
पणजी ते म्हापसा प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासह उत्तर गोव्यातील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वरीतील वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून मोठी समस्या बनली होती. आता हा उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे पणजी ते म्हापसा दरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून इंधनाची मोठी बचत होईल आणि हवेचे प्रदूषण रोखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, पर्वरी परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमी होऊन स्थानिक वाहतूक अधिक सुरक्षित होईल. हा उड्डाणपूल केवळ काँक्रीटची रचना नसून, २९ महिन्यांच्या त्रासानंतर जनतेला मिळालेला मोठा दिलासा मानला जात आहे.


