काणकोणच्या नागरिकाला डिजिटल अरेस्टद्वारे ७४.७२ लाखांना लुबाडले

सायबर गुन्हे विभागात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
काणकोणच्या नागरिकाला डिजिटल अरेस्टद्वारे ७४.७२ लाखांना लुबाडले

म्हापसा : काणकोण येथील एका ६० वर्षीय नागरिकाला डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून ७४.७२ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हा लुबाडणुकीचा प्रकार दि. १२ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान घडला. फिर्यादीला तीन वेगवेगळ्या वॉट्सअप क्रमांकावरून कॉल आले. संशयितांनी आपण सीबीआयचे (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिंगेशन) अधिकारी असल्याचे भासवले. तक्रारदारांच्या नावावर नोंदणीकृत असलेले मोबाईल सीम कार्ड हे गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरले जात आहे असे सांगून त्यांना धमकावले.

तसेच आरोपींनी तक्रारदाराला खरे वाटणारे एक बनावट वॉरंट दाखवले आणि पडताळणीच्या नावाखाली त्यांना बेकायदेशीरपणे डिजिटल अरेस्ट करून ठेवले. त्यानंतर भीती व दबाव टाकून भामट्यांनी आपल्या विविध बँक खात्यांमध्ये एकूण ७४ लाख ७२ हजार रुपये रक्कम हस्तांतरित करण्यास फिर्यादींना भाग पाडले.

अज्ञात आरोपींनी संगणक प्रणालीचा वापर करून आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे खोटे सांगून फिर्यादींची लुबाडणूक केली. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर गुन्हे विभागात धाव घेत तक्रार दिली.

पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ३१८(४), ३१९(२), ३०८(२) व ३(५) आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६-ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा