जीम विद्यार्थिनीवरील चाकूहल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी

हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
15 hours ago
जीम विद्यार्थिनीवरील चाकूहल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी

वाळपई : पर्ये-सत्तरी येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहात चार दिवसांपूर्वी घडलेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसतिगृहातील खोलीत झोपलेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच सहाध्यायी विद्यार्थिनीने चाकूने हल्ला केल्याचा आरोप असून, याप्रकरणी वाळपई पोलिसांनी २६ वर्षीय सुकन्या सब्बहानी हिला अटक केली आहे.
५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता ही घटना घडली. लखनौ येथील २५ वर्षीय विद्यार्थिनी खोलीत झोपलेली असताना तिच्यावर चाकूने हल्ला झाल्याचा आरोप आहे. तिच्या गळ्यावर गंभीर दुखापत झाली असून हातांवरही वार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
जखमी विद्यार्थिनीला अद्याप रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले नाही. प्रकृती पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर तिचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाशी संबंधित इतर विद्यार्थिनींचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट
आरोपी सुकन्या सब्बहानी ही हैदराबाद येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. पीडित आणि आरोपी दोघीही अलीकडेच संस्थेशी संलग्न झाल्याचे समजते. दोघींमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूप चाकूहल्ल्यात कसे बदलले, याचा तपास सुरू आहे.
हल्ल्यातील चाकू कुठून आणला, तपास सुरू
पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीने चाकूने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू कुठून आणण्यात आला, हल्ल्यापूर्वी दोघींमध्ये वाद झाला होता का आणि घटनेमागे अन्य काही कारण आहे का, या सर्व बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेच्या व्यवस्थापनाकडूनही बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा
सर्व पहा