म्हापसा : मंदिरात जाण्यासाठी घर मोलकरणीच्या भरोवशावर सोडून जाण्याचा प्रकार पर्वरीतील एका कुटुंबाच्या अंगलट आला. सावळी नामक मोलकरणीने अवघ्या अर्धातासात घर साफ करीत ३० लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला.
सबनीश पॅलेसमधील एका बंगल्यात ही चोरी झाली. याप्रकरणी घर मालक रेखा राजेश ढुल्ला यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, चोरीची घटना शुक्रवार, ४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वा. दरम्यान घडली.
फिर्यादी ही पर्वरीतील एका मंदिरात देवदर्शनासाठी गेली होती. तर, संशयित आरोपी सावळी ही मोलकरीण घरात एकटीच होती. मालकीण घराबाहेर पडल्यानंतर घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम व दागिने घेऊन मोलकरीण पसार झाली. फिर्यादींनी घरातील कपाटे तपासली तेव्हा आतील ३ लाखांची रोख रक्कम आणि जवळपास २५ ते २७ लाखांचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. पर्वरी पोलिसांनी मोलकरीणीची शोधाशोध केली. परंतु ती सापडली नाही.
दरम्यान, संशयित महिला दोन दिवसांपूर्वीच फिर्यादींकडे घरकाम करण्यासाठी आली होती. तिने आपले नाव सावळी असून आपण बेती येथे राहत असल्याचे मालकांना सांगितले होते. तिने स्वत:चे नाव बनावट सांगितले होते.
पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३०६ कलमान्वये घरफोडीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिरोडकर हे करीत आहेत.


