म्हापसा : मोरजी येथील उमाकांत खोत (६३) यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक कुमार नेदुरूमल्ली (रा. बंगळुरू) यांना मेरशी येथील उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने (जलद) आरोपातून मुक्त केले आहे. यापूर्वी न्यायालयाने या गुन्ह्यातील इतर तिन्ही संशयितांना दोषमुक्त केले होते.
प्रथमदर्शनी साक्षीदार नाही. तसेच संशयित अशोक कुमार यांच्या विरोधात सबळ पुरावे नाहीत, असे निरीक्षण न्या. शिल्पा पंडित यांनी या आदेशात नोंदवले आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये न्यायालयाने अशोक कुमार नेदुरूमल्ली यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता.
दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते १.३० वा. च्या दरम्यान जमिनीच्या वादातून ही खुनाची घडली होती. याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी फिर्यादी अर्जुन गावडे यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. वरचावाडा मोरजी येथील सर्व्हे क्रमांक १४९/१ च्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने डोंगर कापणी करून सुरू असलेल्या जमिनीच्या सपाटीकरणाला विरोध फिर्यादींचे मामा उमाकांत खोत (६३) यांनी केल्याने त्यांचा खून केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले होते.
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मांद्रे पोलिसांनी संशयित विजी सुप्पन, लोकेश पुत्तास्वामी व रोहीत कुमार प्रजापती या तिघांना अटक केली होती. तर, अशोक कुमार नेदुरूमल्ली हा फरार होता.
पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याच दरम्यान तिघा संशयितांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. संशयितांचा हा जामीन अर्ज मंजूर करत त्यांची सशर्त जामिनावर सुटका केली होती. तर, संशयित अशोक कुमार याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला होता. त्यानंतर अशोक कुमार याच्यासह सर्व संशयितांनी न्यायालयात आरोपातून मुक्त करण्याचा अर्ज दाखल केला होता.
दोषारोप सिद्ध करणारी सामग्री उपलब्ध नाही
न्यायालयात सुनावणी झाली असता, या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. तसेच अर्जदार हा घटनेच्यावेळी घटनास्थळी नव्हता. त्यामुळे सदर गुन्ह्याशी त्याचा थेट संबंध जोडता येईल, अशी कोणतीही दोषारोप सिद्ध करणारी सामग्री उपलब्ध नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित अशोक कुमार याला आरोपमुक्त केले. तत्पूर्वी न्यायालयाने विजी सुप्पन, लोकेश पुत्तास्वामी व रोहीत कुमार प्रजापती या तिघांनाही दोषमुक्त केले होते.


