राज्यात तीन घरांना आग लागून हानी

मोरजी, फातोर्डा, म्हाऊस येथे लाखोंचे नुकसान

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
10 hours ago
राज्यात तीन घरांना आग लागून हानी

पेडणे/मडगाव/वाळपई : राज्यात गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी घरांना आग लागण्याच्या तीन घटना घडल्या. मोरजीतील आगीत ५० लाखांहून अधिक, फातोर्डा येथे सुमारे ६ लाख, तर म्हाऊस येथील आगीत २ लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी वित्तहानी टळली.

मोरजीत घराला भीषण आग; ५० लाखांहून अधिक नुकसान

उर्मल बागवाडा, मोरजी येथे शेटगावकर बंधूंच्या घराला दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक भीषण आग लागून ५० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. शॉर्टसर्किटमुळे घराच्या छपराला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील मौल्यवान वस्तूंसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाचा बंब येण्याची वाट न पाहता स्थानिकांनी पंप सुरू करून उपलब्ध पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आग आसपासच्या भागात पसरण्यापासून काही प्रमाणात रोखण्यात यश आले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले.

आगीमध्ये घराच्या किचन रूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. किचनमधील साहित्य, फ्रीज तसेच अन्य संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. घरातील कपडे आणि इतर मौल्यवान साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी केल्या होत्या. या वस्तूही आगीत जळून गेल्याने शेटगावकर कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे प्रथम घराच्या छपराला आग लागली आणि त्यानंतर काही वेळातच आगीने मोठा पेट घेत घराच्या अन्य भागाला कवेत घेतले. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे उर्मल बागवाडा परिसरात एकच खळबळ उडाली.

आगीची माहिती मिळताच मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आगीत झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेटगावकर कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. या संकटाच्या काळात आपण कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून, सरकारच्या माध्यमातून शक्य ती योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार आरोलकर यांनी दिले.

सुवर्णालंकार वितळले; रोकडही आगीच्या भक्ष्यस्थानी

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील कपाटात ठेवलेले किमती सुवर्णालंकार आणि रोख रक्कमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की काही सुवर्णालंकार वितळल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. घरातील मौल्यवान वस्तू, सोने, रोकड, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे आणि संसारोपयोगी साहित्य यांचा विचार करता एकूण नुकसान ५० लाखांपेक्षा अधिक असण्याची शक्यता कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. 

फातोर्डा येथे फ्लॅटला आग, सहा लाखांची हानी


फातोर्डा येथील विल्सन प्लाझा या इमारतीमधील दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटला आग लागण्याची घटना घडली. मडगाव अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. या आगीचे नेमके कारण अस्पष्ट असून सहा लाखांचे नुकसान झाले.

फातोर्डा येथील विल्सन प्लाझा इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली. याबाबतची माहिती मुख्य कार्यालयाकडून मडगाव अग्निशामक दलाला सकाळी १० च्या सुमारास मिळाली. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. जवानांनी दोन गाड्या पाण्याचा वापर करत आगीवर नियंत्रण आणले.

दलाचे अधिकारी गिल सुझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेला फ्लॅट बंद होता. घरातील व्यक्ती कामासाठी बाहेर गेले होते. त्यांना शेजार्‍यांकडून घरातून धूर येत असल्याचे समजताच त्यांनी अग्निशामक दलाला बोलावले. आगीची सुरुवात ही फ्लॅटच्या बेडरुममधून झाल्याचे दिसून येते. या आगीत फ्लॅटमधील एसी, कपाट, कपडे, ओव्हन व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. आग लागलेल्या फ्लॅटच्या बाजूच्या फ्लॅटलाही आगीची झळा पोहोचल्या आहेत. या आगीत सहा लाखांची हानी झाली असून, सात लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.

सदर फ्लॅट अरुणकुमार तळेकर यांच्या मालकीचा असून ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्यापही माहिती मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. या आगीच्या घटनेनंतर इमारतीतील अग्निसुरक्षा उपाययोजना आणि इतर मूलभूत सुविधांची स्थिती तपासणी करण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त होत आहे. 

चिंचमळा-म्हाऊस येथे घराला आग लागून दोन लाखांचे नुकसान


म्हाऊस पंचायत क्षेत्रातील चिंचमळा, जे. के. बारजवळ युसुफ बेग यांच्या घराला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत घराचे छप्पर, कपडे, फर्निचर, घरगुती उपकरणे आणि अन्य साहित्य जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

घरात कोणीही नसताना आग लागली. धूर व ज्वाळा दिसताच शेजाऱ्यांनी वाळपई अग्निशामक दलाला माहिती दिली. स्टेशन ऑफिसर द्यानेश्वर गावस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. दुपारी ४ वाजता बचावकार्य पूर्ण झाले.

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जवानांच्या तत्परतेमुळे सुमारे पाच लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. आदम खान, साईनाथ सावंत, आनंद शेटकर आणि आदित्य गावस यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

सत्तरीतील म्हाऊस पंचायत क्षेत्रातील चिंचमळा, जे. के. बारजवळ युसुफ बेग यांच्या घराला गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुमारे दोन लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने सुमारे पाच लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.

दुपारी घरामध्ये कोणीही नसताना घराला आग लागली. घरातून धूर आणि आग बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ वाळपई अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर द्यानेश्वर गावस यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी पोहोचले. जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर दुपारी ४ वा. घटनास्थळीची कारवाई पूर्ण करण्यात आली.

या आगीत घरातील छपरासह घरातील विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपडे, खुर्च्या, घरगुती उपकरणे तसेच इतर मौल्यवान आणि वापरातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे सदर घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेत वाळपई अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर द्यानेश्वर गावस यांच्या नेतृत्वाखाली आदम खान, साईनाथ सावंत, आनंद शेटकर आणि आदित्य गावस यांनी मदतकार्य केले.