आगशी येथे आमदारांच्या बंधूंवर सुरी हल्ला

अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
12 hours ago
आगशी येथे आमदारांच्या बंधूंवर सुरी हल्ला

म्हापसा : आगशी तिसवाडी येथील एका बारमध्ये क्षुल्लक वादातून साईश मुकेश बोरकर (२९, रा. वड्डाभाट, नेवरा- तिसवाडी) यांच्यावर सुरी हल्ला करण्यात आला. जखमी साईश हे आमदार वीरेश बोरकर यांचे बंधू असून पोलिसांनी या प्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मारहाणीचा घटना आगशी येथील फ्लॉइड बार अँड रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी दुपारी २.४५ वा. सुमारास घडली. संशयित आरोपींनी क्षुल्लक कारणावरून फिर्यादी साईश बोरकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर एका आरोपीने फिर्यादीवर चाकूने वार केल्याने फिर्यादीला शारीरिक दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच आगशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला तत्काळ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले. उपचारानंतर बोरकर यांना घरी पाठवण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) व ३ (५) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर हे करीत आहेत.