पणजी : गोव्यातील जमीन व्यवहाराच्या नावाखाली बंगळुरूस्थित एका रिअल इस्टेट कंपनीची ८ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी बंगळुरू येथील सदाशिवनगर पोलीस स्थानकात म्हापसाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर आणि योगेश नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे परत करण्यासाठी आरोलकर यांनी २०२५ मध्ये कंपनीला तीन धनादेश दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यापैकी दोन धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने बाऊन्स झाले. तर तिसऱ्या धनादेशावर छेडछाड करून व्हॉईटनर लावून तो रद्द करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कंपनीने केला आहे. या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संशयिताकडे संपर्क साधला असता, त्याची ८,१९,१३,०८० रुपयांची फसवणूक झाल्याची समोर आल्यानंतर तक्रार करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू येथील देवीरक्ष इस्टेट्स प्रा. लि. कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी दर्शन एस. यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कंपनीला गोव्यात शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी जमीन हवी होती. त्यानुसार मार्च २०२३ मध्ये ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून जमिनीचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी योगेश नावाच्या व्यक्तीने गोव्यात पेडणे तालुक्यातील धारगळ येथील सर्व्हे क्रमांक १७७/१ मधील २८,८२५ चौ. मीटर जागा दाखवली. सदर जमीन तारक आरोलकर यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले.
जमिनीच्या व्यवहाराबाबत चर्चा झाल्यानंतर बंगळुरू येथील कंपनीच्या कार्यालयात दोन्ही संशयितांच्या उपस्थितीत १९ कोटी रुपयांना जमीन खरेदी करण्याचा व्यवहार ठरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. ठरल्याप्रमाणे जमीन कंपनीच्या नावावर करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. त्यासाठी कंपनीकडून विविध बँक व्यवहार, डिमांड ड्राफ्ट आणि टीडीएसच्या माध्यमातून सुमारे १९ कोटी रुपये घेतले. त्यानंतर संशयितांनी वारंवार सांगूनही जमिनीची नोंदणी केली नाही.
जमीन नोंदणीस विलंब होत असल्याने कंपनीला संशय आला. त्यानंतर चौकशी केली असता, सदर जमीन आरोलकर यांनी २० मार्च २०२० रोजी प्रेमचंद गोयल आणि २ ऑगस्ट २०२१ रोजी छवी गोयल यांच्या नावावर केल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने पैसे परत करण्याची मागणी केली.
आरोलकरच्या कोठडीची मागणी
या प्रकरणाची दखल घेत सदाशिवनगर पोलिसांनी तारक आरोलकर आणि योगेश नामक व्यक्तीविरोधात भादंसंच्या कलम १२०(बी), ४२० आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, तारक आरोलकर याला गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने अटक केल्याने सदाशिवनगर पोलिसांनी त्याची कोठडीची मागणी केली आहे.


