सांकवाळ अपघात प्रकरण: मर्सिडीजचालक विद्याधर प्रभूला पोलीस कोठडी

सांकवाळ येथे मर्सिडीजच्या धडकेत दुचाकीस्वाराचा बळी घेणाऱ्या मद्यधुंद चालक विद्याधर प्रभूला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अपघातापूर्वी त्याने स्वतःच्या पालकांवरही हल्ला केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 mins ago
सांकवाळ अपघात प्रकरण: मर्सिडीजचालक विद्याधर प्रभूला पोलीस कोठडी

पणजी : दक्षिण गोव्यातील सांकवाळ येथे बेदरकारपणे मर्सिडीज चालवून दुचाकीस्वाराचा बळी घेणाऱ्या विद्याधर प्रभू (वय ३२, रा. फातोर्डा) याला वेर्णा येथील न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वेर्णा पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर संशयिताची सखोल चौकशी सुरू असून, या तपासादरम्यान आरोपीच्या कौटुंबिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत गंभीर माहिती समोर आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी संशयित विद्याधर याने फातोर्डा येथील निवासस्थानी मद्यधुंद अवस्थेत धुमाकूळ घातला होता. कौटुंबिक मालमत्तेच्या विक्रीवरून झालेल्या वादातून त्याने आपले वृद्ध वडील विनायक प्रभू (वय ६३) आणि आई शर्मिला प्रभू यांच्यावर हल्ला केला होता. संशयिताच्या हिंसक वर्तनाला घाबरून पालकांनी सांकवाळ येथील नातेवाईकांकडे आश्रय घेतला. मात्र, २ सप्टेंबर रोजी सकाळी संशयिताने पालकांचा पाठलाग करून त्यांना रस्त्यात गाठले आणि पुन्हा मारहाण केली. या प्रकरणी फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला प्रतिबंधात्मक कारवाईखाली २४ तासांसाठी अटक करण्यात आली होती.



जामिनावर सुटका झाल्यानंतर, ४ सप्टेंबर रोजी विद्याधर याने पुन्हा मद्यधुंद अवस्थेत अत्यंत वेगाने मर्सिडीज चालवून सांकवाळ येथे एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर संशयिताने वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. अपघातात सापडलेली दुचाकी सुमारे अडीच किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत गेल्याने वाहनाने पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून संशयिताला ताब्यात घेतले आणि वेर्णा पोलिसांच्या स्वाधीन केले.



अटकेनंतर संशयिताने वैद्यकीय उपचारांचे नाटक करून तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. अवघ्या ४८ तासांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे नोंद असलेल्या या संशयिताचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा