पणजी: सरकार तीन वर्षे कंत्राटी तत्वावर असणाऱ्या शिक्षकांना/ लेक्चररना सेवेतून कमी करणार नाही. बढती मिळालेल्या शिक्षकांची त्यांच्या पदानुसार बदली केली आहे. बदलीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत शिक्षकांनी सध्या आहे त्याच जागेवर राहावे. त्यानंतर त्यांना नजीकच्या शाळेत बदली दिली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करणे बंद करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, सचिव प्रसाद लोलयेकर, मेघना शेटगावकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मागील दोन दिवस राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत हे पाहून मला विचित्र वाटले. गोव्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन करून समस्या सुटत नाहीत.असे विषय चर्चेतून सुटत असतात. त्यामुळे शिक्षकांना काही समस्या असल्यास शिक्षण खात्याशी संपर्क साधावा.
शिक्षण खात्यातील बढतीची प्रक्रिया २० वर्षे प्रलंबित होती. आम्ही ती पुन्हा चालीस लावली आहे. बढती मिळालेल्या शिक्षकांना नियमानुसार वरिष्ठ पदावर अन्यत्र जावे लागते. असे केले नाही तर त्या शिक्षकांना पदानुसार वेतन मिळणार नाही. यामुळे या प्रक्रियेसाठी शिक्षकांनी देखील सहकार्य करणे आवश्यक आहे.
सरकारी प्राथमिक शाळेस किमान दोन टॅब देणार
ते म्हणाले, राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत आहोत. १५ हजार रुपये पेक्षा कमी वेतन असणाऱ्या कंत्राटी शिक्षकांना ईपीएफ देणे सुरू केले आहे. प्राथमिक स्तरावर कॉम्प्युटरची ओळख होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक सरकारी प्राथमिक शाळेस किमान दोन टॅब दिले जातील. पुढील वर्षी पासून शिक्षक दिनाचा कार्यक्रम सर्व शाळा, महाविद्यालयात लाईव्ह दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यामुळे पुरस्कार विजेते शिक्षक आणि त्यांचे कार्य राज्यभरातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना समजून येईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांसह सामान्य ज्ञान, करिअरविषयी मार्गदर्शन करावे.


