म्हापसा : येथील बाजारपेठेला पुन्हा एकदा चोरांनी लक्ष्य बनवले. काल रात्री अाठ दुकाने फोडण्यात आली. त्यात सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास गेल्याचा अंदाज आहे. एकाच रात्री एवढ्या मोठ्या संख्येने दुकाने फोडली गेल्याने पोलीस गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज सकाळी दुकानदार आपली दुकाने खुली करण्यासाठी आले असता हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला. बाजारपेठेतील भाजी मार्केट परिसरातील एकूण पाच दुकाने फोडली गेली. तर मडकी मार्केट जवळील एक तर इतरत्रची दोन दुकाने फोडल्याचे आढळून आले आहे.
या आठ दुकानांमधून रोख रक्कम व अन्य वस्तू मिळून सुमारे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. ही चोरीची घटना उघडकीस आल्यावर दुकानदारांनी म्हापसा पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, काल शुक्रवारी आठवडा बाजाराचा दिवस होता. याचा फायदा घेत हे अज्ञात चोरटे बाजारपेठेत लपून बसले. नंतर त्यांनी आपले चोरीचे नियोजन धसास लावले. बाजारपेठेत रात्रीच्या वेळी मोठी पोलीस गस्त असते. अशावेळी दुकाने फोडण्याची ही साखळी चोरी झाल्याने पोलीस गस्त आणि बाजारपेठेच्या सुरक्षेवर व्यापारी वर्गाने सवाल उपस्थित केला आहे.

दुकानात चोरी करून शटर पुन्हा बंद केले
दुकानांच्या शटरची कुलुपे तोडून चोर आत शिरले. चोरी करून परत शटर बंद करून तोडलेले कुलूप त्यांनी पुन्हा लावले. जणू काही घडलेच नाही असे दाखवून दुकानदारांना व गस्तीवरील पोलिसांनाही चकवा देण्याचा हा प्रयत्न होता, अशी माहिती काही दुकानदारांनी दिली



