सांकवाळ भीषण अपघातातील मर्स‌िडीज चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून अटक

दारूच्या नशेत वाहन चालवल्याने अपघात; अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी: सांकवाळ येथे शिंदोळी परिसरात काल शुक्रवारी भरधाव मर्सिडीज कार चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विद्याधर प्रभू (फातोर्डा येथील रहिवासी) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून वेर्णा पोलिसांनी अटक केली.. या भीषण अपघातात दुचाकी चालक अशोक कुमार चौहान (३७ वर्षे, राहणारा सांकवाळ, मूळ झारखंड) या युवकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत मागे बसलेला सोनु कुमार चौहान गंभीर जखमी झाला.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
सांकवाळ भीषण अपघातातील मर्स‌िडीज चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून अटक

वास्को : सांकवाळ येथे  शिंदोळी परिसरात काल शुक्रवारी भरधाव मर्सिडीज कार चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विद्याधर प्रभू (फातोर्डा येथील रहिवासी) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून  वेर्णा पोलिसांनी अटक केली. या भीषण अपघातात दुचाकी चालक अशोक कुमार चौहा (३७ वर्षे, राहणारा सांकवाळ, मूळ झारखंड) या युवकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत मागे बसलेला  सोनु कुमार चौहान  गंभीर जखमी झाला.

या भीषण अपघातात कारची धडक दुचाकीला बसल्यानंतर दुचाकी सुमारे अडीच  किमी फरफटत नेण्यात आली. आणि नंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता. दोन्ही वाहने आगीत जळून खाक झाली होती. 

वेर्णा पोलिसांनी मर्सिडीज कार चालक विद्याधर प्रभू याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १०५, १२५ (ए), १२५ (बी), आणि वाहन कायद्याच्या १३४ ए आणि बी व १८५ कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. यासंदर्भात पोलीस हवालदार निलेश नागवेकर यांनी वेर्णा पोलीस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारीत अपघाताच्या एकूण घटनाक्रमाची माहिती देतानाच मर्स‌िडीज चालक विद्याधर प्रभू याने दारूच्या नशेत पुढून आलेल्या  दुचाकीला धडक दिल्याचे म्हटले आहे.  धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी मर्स‌िडीजमध्ये अडकली आणि फरफटत गेली. सुमारे अडीच किलोमीटरावर दोन्ही वाहने थांबली आणि अचानक आग लागली. मद्यधुंद स्थितीत कारमध्ये अडकलेल्या चालकाला अपघातस्थळी असलेल्यांनी बाहेर काढून त्याचे प्राण वाचवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. या अपघातामुळे शिंदोळी परिसरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, दुपारच्या वेळी या परिसरातून शाळकरी विद्यार्थी आणि पादचारी मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. भरधाव वाहनाने त्यांच्यावर धडक दिली असती तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. अपघातानंतर मर्स‌िडीज चालक विद्याधर प्रभू याला वेर्णा पोलिसांनी  रात्री ११ वाजता अटक केली.

चालक मद्यधुंद असल्यास खुनाचा गुन्हा नोंदवा : सिमोईस

या भीषण अपघाताचा कॉंग्रेस नेते ऑलेंसियो सिमोईस यांनी तीव्र निषेध केला आहे. दोषी चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. चालकाने मद्यधुंद  अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालविल्याचे तपासात सिद्ध झाल्यास, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सिमोईस यांनी केली.

मद्यधुंद चालकांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या भीषण अपघाताने पुन्हा एकदा मद्यधुंद व बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा