तिलारीचा उजवा कालवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद; पेडणे तालुक्याला पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था

कळणे नदीच्या पाण्याने होणार तिलारीची भरपाई

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
20th October, 11:33 pm
तिलारीचा उजवा कालवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद; पेडणे तालुक्याला पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था

पणजी : तिलारीचा उजवा कालवा दुरुस्तीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आल्याने राज्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणीपुरवठा खात्याने पर्यायी व्यवस्था केली आहे. तिलारीच्या पाण्याऐवजी कळणे नदीतून प्रतिदिन ११५ एमएलडी पाणी उपसून चांदेल प्रकल्पाला पुरवठा केला जाणार आहे. बैलपार येथे या पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे.

याशिवाय, हणखणे येथे साळ नदीतून प्रतिदिन १०० एमएलडी पाणी उपसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिलारीचा पाणीपुरवठा बंद असला, तरी राज्यातील पाणीपुरवठ्याच्या स्थितीवर परिणाम होणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा खात्याचे कार्यकारी अभियंता यतीन शिरोडकर यांनी दिली.

तिलारीच्या उजव्या कालव्यातून पाण्याची गळती होत असल्याने त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे २० ऑक्टोबरपासून हा कालवा बंद करण्यात आला असून, ३१ डिसेंबरपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. या कालव्यातून पेडणे तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो. कालव्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्या वर्षीच मांडण्यात आला होता. मात्र, गोवा सरकारची मान्यता न मिळाल्याने दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले होते.

सध्या पिण्याच्या पाण्याचा वापर आंघोळीसह वाहनांच्या धुलाईसाठीही केला जातो. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. तसेच, पाण्याची गळती रोखण्यासाठीही उपाययोजना आखल्या जाणार आहेत.

कृती पथकाकडून पाण्याच्या उपलब्धतेसोबतच तापमान आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांचाही आढावा घेतला जाणार आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पुढील वर्षीही पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई उद्भवू नये, यासाठी पर्यायी पाणीपुरवठ्याच्या व्यवस्था करण्यावर खात्याचा भर आहे.

कृती पथकाची स्थापना

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करण्यासाठी सरकारने कृती पथकाची स्थापना केली आहे. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाऊस झाला नाही, तरी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून पुरवठा सुरू ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी कृती पथकाची दर महिन्याला बैठक घेऊन पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला जाणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा