नळाचे पाणी बेभरवशाचे; डाब ग्रामस्थांकडून तळीचे संवर्धन

पाणीटंचाईची टांगती तलवार : स्वकष्टातून नैसर्गिक जलस्रोताची​ साफसफाई

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
2 hours ago
नळाचे पाणी बेभरवशाचे; डाब ग्रामस्थांकडून तळीचे संवर्धन

फोंडा : बोरी पंचायत क्षेत्रातील डाब गावामध्ये गेल्या दोन दशकांपासून नळावाटे पाणी पुरवठा करण्यात सरकार अपयशी ठरल्याने, अखेर ग्रामस्थांनीच एकत्र येत पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने येणाऱ्या काळात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी रविवारी डाब येथील ग्रामस्थांनी विशेष बैठक घेऊन गावातील नैसर्गिक झऱ्याची व तळीची स्वच्छता करण्यास सुरुवात केली.
डाब गावात सुमारे २० वर्षांपूर्वी नळ योजनेसाठी पाण्याची वाहिनी टाकण्यात आली होती. परंतु, आजही या वाहिनीतून पाणी पुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. काही वर्षांपूर्वी जलस्रोत खात्याने गावातील तळीचे बांधकाम अर्धवट स्थितीत सोडून दिले होते. या सर्व प्रकारामुळे शासकीय आश्वासनांवर विसंबून न राहता, ग्रामस्थांनी स्वबळावर नैसर्गिक झऱ्याचे संवर्धन करण्याचा मार्ग निवडला आहे.
रविवारी पार पडलेल्या या स्वच्छता मोहिमेत गावातील तरुण वर्गासोबतच ६५, ७० आणि ७५ वर्षे वयाच्या वृद्ध महिलांनीही हिरिरीने भाग घेतला. डोंगर भागातून वाहून आलेला गाळ तळीत साचल्यामुळे पाण्याचा साठा कमी झाला होता. हा गाळ उपसल्यानंतर मे महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास वृद्ध महिलांनी व्यक्त केला. तसेच गावात सध्या चर्चच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने पाण्याची मागणी अधिक वाढली आहे.
२० वर्षांपूर्वी गावात नळाची पाईपलाईन टाकली, पण आजही पाणी मिळाले नाही. पूर्वी या तळीत मे महिन्यापर्यंत पाणी राहायचे, पण गेल्या ७-८ वर्षांत गाळ साचल्याने अडचण झाली. म्हणूनच सरकारच्या भरवशावर न राहता वृद्ध महिला आणि युवकांना सोबत घेऊन तळीची साफसफाई सुरू केली आहे.
-सेल्वीस्टर वाझ, स्थानिक नागरिक
पंचायतीकडून सहकार्याचे आश्वासन
ग्रामस्थांनी स्वतःहून तळीची साफसफाई सुरू केल्याची माहिती मिळताच स्थानिक पंच देवेंद्र गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक केले. डाब गावातील पाण्याचा प्रश्न खरोखरच अत्यंत गंभीर बनला असून, या मोहिमेसाठी बोरी पंचायतीतर्फे ग्रामस्थांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.      

हेही वाचा
सर्व पहा