पायाभूत सुविधांचा विकास निर्यात क्षेत्राला लाभदायक: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

तरुण उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात आघाडी घ्यावी; राज्यात पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. दोन विमानतळे, बंदर, राज्यभर पसरलेले रस्त्यांचे जाळे यामुळे येथून निर्यात क्षेत्रातील व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. राज्यातील तरुण उद्योजकांनी या संधीचा फायदा घेऊन निर्यात क्षेत्रात आघाडी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
36 mins ago
पायाभूत सुविधांचा विकास निर्यात क्षेत्राला लाभदायक: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी : राज्यात पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. दोन विमानतळे, बंदर, राज्यभर पसरलेले रस्त्यांचे जाळे यामुळे येथून निर्यात क्षेत्रातील व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. राज्यातील तरुण उद्योजकांनी या संधीचा फायदा घेऊन निर्यात क्षेत्रात आघाडी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले.

सोमवारी मुक्त व्यापार करारांवर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी खात्याचे सचिव संतोष सुखदेवे, संचालक अंकित यादव, केंद्रीय सचिव अमिताभ कुमार, राजकुमार कामत , संजय आमोणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आंतरराष्ट्रीय व्यापारात गोवा एक प्रमुख स्थान म्हणून उदयास येत आहे. गोव्याच्या तरुण उद्योजकांनी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी देशांतर्गत सीमांच्या पलीकडे पाहणे आवश्यक आहे. उच्च मूल्याच्या जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे काळाची गरज आहे. गोव्याकडे विशिष्ट भौगोलिक फायदे, उच्च दर्जाची  उत्पादने आणि मजबूत पायाभूत सुविधा आहेत. यात  जगप्रसिद्ध काजू, फेणी, मानकुराद आंबे तसेच अन्य जीआय टॅग मिळालेल्या उत्पादनांचा समावेश आहे. खनिज किंवा मत्स्य उत्पादनांसह या उत्पादनांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

ते म्हणाले, राज्यात मुरगाव बंदर प्राधिकरण, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणारे वेगवान महामार्ग यांच्या पाठबळावर लॉजिस्टिक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. लहान व्यवसायांना जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी संस्थात्मक मार्गदर्शन, गुणवत्ता प्रमाणपत्रे, सुव्यवस्थित पॅकेजिंग, बाजारपेठ संशोधन महत्त्वाचे आहे. यासाठी खात्यातर्फे आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे. उद्योग क्षेत्रातील संघटनांनी देखील तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करावे. तसेच त्यांना येणाऱ्या निर्यात-संबंधित अडचणी सोडवण्यासाठी मदत करावी.

भारताने व्यापार विस्ताराचा मार्ग स्वीकारला आहे. सहा वर्षांच्या कालावधीत ३८ देशांचा समावेश असलेले नऊ मोठे मुक्त व्यापार करार पूर्ण केले आहेत. तसेच युएई, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, ओमान यांच्याशी अलीकडेच व्यापार करार झाले आहेत. युरोपियन युनियन आणि न्यूझीलंडसोबत व्यापारी वाटाघाटी प्रगतीपथावर आहेत. पुढील काही वर्षांत एकूण वार्षिक निर्यात २ ट्रिलियन डॉलर्स पर्यंत करण्याचे उद्दिष्ट आहे. या महत्त्वाकांक्षी ध्येयामध्ये गोव्याने आपले भरीव योगदान दिले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा