संविधान, लोकशाहीच्या रक्षणासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज : राहुल गांधी

मडगाव येथे 'गोवा राखण यात्रा' समारोप सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप सरकारवर तीव्र टीका करत गोव्यातील जनतेला परिवर्तनासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत देण्याचे आवाहन केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
संविधान, लोकशाहीच्या रक्षणासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज : राहुल गांधी

मडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व ज्ञानेश कुमार यांचे खरे रूप जनतेसमोर आले आहे. गोव्यातील जमिनी विकल्या जात आहेत. तरुणांना रोजगार नाहीत, शिक्षण व्यवस्था बिघडलेली आहे. हे बदलण्यासाठी गोव्यातील जनतेने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत द्यावे, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मडगावात आयोजित गोवा राखण यात्रेत केले.

गोवा राखण यात्रेचा समारोप मडगाव येथे झाला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या यात्रेत सहभाग घेतला. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, सहप्रभारी अंजली निंबाळकर, एल्टन डिकोस्टा, कार्लूस फेरेरा आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी गोवा राखण अभियान या नव्या उपक्रमाची सुरुवात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या उपक्रमांतर्गत गावागावात जाऊन तेथील प्रश्न समजून घेण्याचा व लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाईल. 

मडगाव एमसीसी मैदानाच्या पार्किंगमध्ये आयोजित सभेत गांधी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. देशाची संपत्ती मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी वापरली जात असून, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सामान्य जनता, युवक आणि स्थानिक व्यावसायिकांच्या हितांकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप त्यांनी केला. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर आणि स्थानिक रोजगारावर चुकीच्या धोरणांचा परिणाम होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

या यात्रेने गोव्यातील लोकांचे खरे मुद्दे समोर आणले, नेते जनतेत गेल्याने जनतेचे खरे दुःख त्यांना समजून आले. देशात मोदी-शहा-ज्ञानेश कुमार मिळून मत चोरी करत आहेत. आपल्यावर ४५ पेक्षा जास्त अवमान याचिका आहेत पण मत चोरीबबत मोदींवर टीका केली म्हणून एकही याचिका दाखल नाही कारण त्यामुळे सर्व खरा प्रकार जनतेसमोर येऊ शकतो अशी भीती त्यांना आहे. देशात विविध राज्यात मतांची चोरी होत असल्याचे पुराव्यासह दाखवून दिलेले आहे. जनता हीच संविधानाची संरक्षक असून ही मत चोरी रोखली गेली पाहिजे. काँग्रेस न्याय मिळवणारच आणि मत चोरी ज्यांनी-ज्यांनी केलेली आहे त्यांना त्याची भरपाई करावीच लागेल असा इशाराही गांधी यांनी दिला. देशात घडणाऱ्या घडामोडींकडे उघड्या डोळ्यांनी पाहून सामान्य जनतेच्या खऱ्या समस्या समजून घेणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले. संविधानाचे रक्षण म्हणजे जनतेच्या हक्कांचे रक्षण असून, नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकेकाळी देशाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्याला आज चुकीच्या धोरणांमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बेरोजगारीत गोवा देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील युवकांना पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही, पर्यटन व्यवसायाचा फायदा मोठ्या उद्योजकांना होत असल्याचा आरोप त्यांनी केला. गोव्यातील जमिनी धनदांडग्यांना विकली जात आहे. पैसे करणे हेच भाजपच्या मंत्र्यांचे व आमदारांचे काम आहे. गोव्याची ओळख, स्वायत्तता आणि स्थानिक जनतेचे हित जपण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

देशातील विमानतळे, नैसर्गिक संसाधने आणि महत्त्वाचे प्रकल्प मोजक्या उद्योगपतींच्या ताब्यात दिले जात असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली. अदानींसारख्या निवडक उद्योगपतींच्या हितांना प्राधान्य दिले जात असून, गुजरात मॉडेलच्या नावाखाली गोव्याची संसाधने आणि स्वायत्तता धोक्यात आणली जात असल्याचे ते म्हणाले. गुजरात हे मतचोरीचे तर गोवा हे भ्रष्टाचाराचे मॉडेल बनलेले आहे अशी टीकाही त्यांनी केली.

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील परिस्थितीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. शिक्षण व्यवस्था कमकुवत होत असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असून, आरोग्य सेवा सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचा दावा त्यांनी केला. ही लढाई केवळ राजकीय नसून सामान्य जनतेचे हक्क आणि भविष्य सुरक्षित ठेवण्याची असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारकडून अत्याचार केले जात आहेत. आरएसएसच्या लोकांना शिक्षण व्यवस्थितच्या विविध स्तरावर सहभागी केलेले आहे. संघात असलेल्या व्यक्तींना कोणतीही पदे दिली जात आहेत. केंद्र सरकारविरोधात युवकांमध्ये असंतोष वाढत असून, जनतेचा रोष आगामी काळात सरकारसाठी आव्हान ठरेल, असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणारे काँग्रेसचे सरकार असण्याची गरज असून गोव्यातील जनतेने काँग्रेसलाच बहुमताने निवडून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण आरोग्य रोजगार पर्यटन राखले गेले पाहिजे ही लढाई लोकांची आहे लोकांवर रोजचा होणारा अत्याचार रोखण्यासाठी काँग्रेस सत्तेत येणे गरजेचे आहे त्यासाठी ताकतीने लढा द्यावा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

दिल्लीत मोदी व शहाणा आम्ही पाहून घेऊ. युवक त्यांच्या विरोधात असून त्यांची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे हे त्यांनाही माहिती आहे. जनतेला व देशाला मोदी व शहांची सत्यता समजून आलेली आहे. त्यामुळे गोव्यात बहुमत मिळविण्यासाठी जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घ्या व ताकदीने लढा देत सरकार आणा असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा