'इंस्टा'वर ओळख, साहिलचे दामिनीवर एकतर्फी प्रेम आणि तिचा नकार; सिंधुदुर्गाला हादरवणाऱ्या खुनाचे गूढ उकलले!

सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या २३ वर्षीय दामिनी पालवची एकतर्फी प्रेमातून चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयिताला अटक केली असून त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण नेमके प्रकरण काय, वाचा!

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
6 hours ago
'इंस्टा'वर ओळख, साहिलचे दामिनीवर एकतर्फी प्रेम आणि तिचा नकार; सिंधुदुर्गाला हादरवणाऱ्या खुनाचे गूढ उकलले!

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात घडलेल्या एका  हादरवून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभरात संताप आणि शोककळा पसरली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी स्वीकारण्यासाठी अवघे दोन दिवस उरलेले असताना, २३ वर्षीय दामिनी पालव या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. कॉलेजवरून घरी परतत असताना कडावल-वर्दे मार्गावर दबा धरून बसलेल्या संशयिताने तिच्यावर चाकूने तब्बल १७ ते १८ वार करत तिचा प्राण घेतला. सिंधुदुर्ग पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासांच्या आतच संशयिताच्या मुसक्या आवळल्या. 

हत्येचे नेमके प्रकरण काय?

ही घटना शनिवारी सायंकाळी ५:४५ ते ६:१० या वेळेत घडली. दामिनी किरण पालव (वय २३, रा. वर्दे-खालची पालववाडी, कुडाळ) ही कुडाळ तालुक्यातील एका महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम शिकत होती. ती नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आपल्या घरातून कॉलेजला गेली होती. दिवसभर शिक्षण पूर्ण केल्यानंतर सायंकाळी ती नेहमीप्रमाणे एस.टी. बसने कडावल येथे उतरली आणि तिथून चालत आपल्या वर्दे येथील घरी जात होती. मात्र, कडावल-वर्दे रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या 'सायल्याचा व्हाळ' परिसराजवळ आधीपासूनच दबा धरून बसलेला संशयित साहिल विश्राम धुरी (वय २२, रा. मठ-धुरीवाडा, ता. वेंगुर्ले) याने तिला अडवले. साहिल याने तिला बळजोरीने रस्त्यावरून बाजूला ओढत नेले आणि तिच्याशी संवाद साधण्याच्या बहाण्याने तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. दामिनीच्या अंगावर तब्बल १७ ते १८ गंभीर वार करण्यात आले. यात तिचे जागीच प्राण गेले. मुंबईत जाऊन आपले स्वतंत्र आयुष्य जगण्याचे आणि करिअर घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण मुलीचे आयुष्य अशा प्रकारे एका व्यक्तीच्या चुकीने संपले. 

खुनी कसा पकडला गेला? पोलीस यंत्रणेची धडक कारवाई

गुन्हा केल्यानंतर संशयित साहिल हा अतिशय थंडपणे आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या मठ येथील घरी पोहोचला. त्याच्या हाताच्या तळव्याला जखमा होऊन रक्त वाहत असल्याचे त्याच्या घरच्यांनी पाहिले आणि त्याला विचारणा केली. मात्र, त्याने घरच्यांना कोणतेही नेमके कारण सांगितले नाही. त्याचे नातेवाईक त्याला उपचारासाठी एका डॉक्टरकडे घेऊन गेले. तिथून घरी परतल्यानंतर त्याने जेवण केले आणि तो आरामात झोपून गेला. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय अधिकारी राजेश भागवत, कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी अत्यंत वेगाने सूत्रे हलवत तपासाची व्याप्ती वाढवली. घटनास्थळापासून घाईगडबडीत रस्त्यावर येऊन काळ्या रंगाचा शर्ट घालून स्प्लेंडर मोटारसायकलवरून कडावलच्या दिशेने जाताना एका प्रत्यक्षदर्शीने एका युवकाला पाहिले होते. या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी डिगस येथील एका दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संशयित वर्णनाचा तरुण आणि त्याची मोटरसायकल स्पष्टपणे दिसून आली. सदर मोटरसायकलचा नंबर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तातडीने हळदोणे मार्गे वेंगुर्ले तालुक्यातील मठ गाव गाठले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास संशयित साहिल धुरी याला त्याच्या राहत्या घरातून अत्यंत गोपनीय आणि वेगाने ताब्यात घेतले. तोपर्यंत त्याने आपल्या घरच्यांसुद्धा या घटनेबाबत कोणतीही वाच्यता केली नव्हती. कुडाळ पोलिसांनी त्याला अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या तपास समोर आलेली माहिती 

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत दामिनी पालव आणि संशयित साहिल धुरी यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. साहिल धुरी यानेही हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला असून तो गोवा येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी तो ती नोकरी सोडून गावी परतला होता. इन्स्टाग्रामवर मागील दोन वर्षांपासून दामिनी आणि साहिल यांची ओळख झाली होती. साहिल दामिनीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने वारंवार दामिनीला प्रेमाची प्रपोजल दिली होती, परंतु दामिनीने त्याचे सर्व प्रस्ताव स्पष्टपणे नाकारले होते. तरीही दोघांमध्ये मोबाईलवर संपर्क होत असे. दामिनी आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नाही, या प्रचंड रागातून आणि नैराश्यातून साहिलने तिची हत्या करण्याचा कट रचला होता.

घटना घडली त्या दिवशी दामिनी बसने उतरून चालत घरी जात असल्याची पूर्ण माहिती साहिलला होती. म्हणूनच तो आधीपासूनच मोटरसायकल घेऊन त्या निर्मनुष्य रस्त्यावर तिची वाट पाहत थांबला होता. दामिनी तिथे पोहोचताच त्याने तिला बोलायचे आहे असे सांगून ओहोळाच्या बाजूला नेले आणि अत्यंत निर्दयीपणे तिच्या पाठीवर, पोटावर आणि गळ्यावर वार केले. घटनेच्या वेळी दामिनीने जिवाच्या आकांताने किंचाळण्याचा प्रयत्न केला, परंतु परिसर पूर्णपणे निर्मनुष्य असल्याने तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचू शकला नाही. काही वेळानंतर डेअरीकडे दूध घेऊन जाणारे काही नागरिक तिथून जात असताना त्यांना दामिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. त्यांनी त्वरित पोलिसांना आणि रुग्णालयाला कळवले, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता.

पोलिसांनी केलेल्या तपासात दामिनी आणि साहिल दोघांचेही मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेला चाकू हस्तगत करणे, तो या हत्येची कित्येक दिवस रेकी करत होता का, या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का आणि या कृत्यामागची नेमकी मानसिक व सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, याचा सखोल तपास कुडाळ पोलीस करत आहेत. दोन दिवसांनी मुंबईसारख्या महानगरात जाऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीचा असा अंत झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


हेही वाचा
सर्व पहा