कुणबी शॉल राहुल गांधींनी फेकून दिली; दहा मिनिटे चालल्याने काही होणार नाही : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राहुल गांधी यांनी गोव्यातील कार्यक्रमादरम्यान कुणबी शालीचा अपमान केल्याचा आरोप मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला असून, काँग्रेसची गोवा राखण यात्रा पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचे म्हटले आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
कुणबी शॉल राहुल गांधींनी फेकून दिली; दहा मिनिटे चालल्याने काही होणार नाही : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी :  कुणबी शॉल एसटी समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जाते. कालच्या कार्यक्रमात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांना घातलेली कुणबी शॉल काढून अक्षरश: फेकून दिली. सर्व गोमंतक‌ियांनी हे पाहिले आहे. गोव्यातील जनता हे कधीही विसरणार नाही. हीच शॉल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली होती. त्यांनी पूर्णवेळ ही शॉल घातली होती. गोव्याची संस्कृती, लोक यांना आदर देण्याचे काम केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपच्या इतर नेत्यांनी केले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant)  यांनी केले. सोमवारी त्यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधी येथे आले, पाच दहा मिनिटे चालले. त्यांनी लोकांना हात दाखवला. मात्र यामुळे काहीही होणार नाही. काँग्रेस सरकार असताना त्यांनी कोणती कामे केली हे सांगावे. भाजप सरकार असताना आम्ही काय केले आहे हे आम्ही सर्व लोकांसमोर ठेवले आहे. काँग्रेस यात्रेला जत्रेचे स्वरूप आले होते. ही जत्रा पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. राहुल गांधी गोव्यात आले म्हणून भाजपला कोणताही फरक पडणार नाही.

ते म्हणाले, आज येथील स्वयंपूर्ण गोवा मॉडेल पाहण्यासाठी बाहेरून लोक येत आहेत. येथील विकासाची कामे पाहण्यासाठी विविध राष्ट्रीय स्तरावरील नेते गोव्यात येतात. राज्यात दोन विमानतळ, एमपीए, महामार्ग बांधणी, उड्डाणपूल व अन्य विकास कामे झाली आहेत. येथील जनतेला ही विकास कामे झाल्याचे माहिती आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी काहीही आरोप केले तरी त्यामध्ये तथ्य नाही. त्यांच्यासारख्या नेत्याने बोलण्यापूर्वी किमान दहा वेळा विचार करणे आवश्यक आहे.

राहुल गांधींकडून कुणबी शॉलचा अपमान : दामू नाईक

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक (Damu Naik)  म्हणाले की, राहुल गांधी यांनी कुणबी शॉल देऊन केलेल्या सन्मानाचा अपमान केला आहे. सन्मानाने दिलेली एखादी गोष्ट काढून फेकणे चुकीचे आहे. मुळात ते या सन्मानासाठी पात्रच नाहीत. कालच्या सभेत त्यांची देहबोली, वरिष्ठांप्रती असणारे भाव यातूनच सर्व काही समजते. राखण यात्रा करण्यापूर्वी मूलभूत संस्कार शिकून घेतले पाहिजेत. गोव्यातील लोकांनी भाजपने केलेला विकास पाहिला आहे. त्यामुळे काँग्रेस यात्रेचा कोणताही परिणाम होणार नाही.

हेही वाचा
सर्व पहा