परराज्यातून झेंडूची आवक वाढल्याने स्थानिक उत्पादकांचे नुकसान

सत्तरीतील उत्पादकांना आर्थिक फटका : सरकारच्या दुर्लक्षामुळे स्थानिक झेंडूंना बाजारपेठ मिळेना

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
3 hours ago
परराज्यातून झेंडूची आवक वाढल्याने स्थानिक उत्पादकांचे नुकसान

वाळपई : परराज्यातून गोव्यात येणाऱ्या झेंडू फुलांच्या वाहतुकीवर आणि विक्रीवर सरकारने योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे स्थानिक झेंडू उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बेळगावसह कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतून मोठ्या प्रमाणात झेंडू फुले विक्रीसाठी आणण्यात आली होती. परिणामी, स्थानिक उत्पादकांनी मेहनतीने फुलविलेल्या झेंडूच्या फुलांना अपेक्षित मागणी मिळाली नाही. याचा मोठा आर्थिक फटका स्थानिक झेंडू उत्पादकांना बसला आहे.

आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या उद्देशाने गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांची लागवड करण्यात आली होती. या उपक्रमासाठी कृषी खात्याने विशेष पुढाकार घेतला होता. शेतकऱ्यांना झेंडूच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात झेंडूच्या रोपट्यांचे वितरण करण्यात आले होते. सत्तरी तालुक्यामध्ये सुमारे एक लाख झेंडूच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. स्थानिक शेतकरी आणि उत्पादकांनी सरकारच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत झेंडूच्या लागवडीसाठी मेहनत घेतली होती.

मात्र, गेल्या काही काळापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे झेंडूच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. पाण्याअभावी लागवडीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आणि झेंडू उत्पादकांना त्याचा आर्थिक फटकाही सहन करावा लागला. अशा परिस्थितीत दसऱ्याचा सण जवळ आल्यामुळे झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी मिळेल, अशी अपेक्षा उत्पादकांनी व्यक्त केली होती. सणासुदीच्या काळात फुलांची विक्री होऊन लागवडीवर केलेला खर्च भरून निघेल आणि काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळेल, अशी आशा त्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच पाहायला मिळाली.

झेंडू फुलांची लागवड करण्यापूर्वी सरकारने या फुलांच्या बाजारपेठेसंदर्भात विशेष उपाययोजना करणे आवश्यक होते. स्थानिक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देताना त्यांच्या उत्पादनाची विक्री कशा पद्धतीने होईल, याचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आज झेंडू उत्पादकांना त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागत असल्याची भावना उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

गोवा फलोत्पादन महामंडळाने स्थानिक झेंडू उत्पादकांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे कृषी खात्यानेही या संदर्भात विशेष लक्ष देऊन उत्पादकांच्या मालाची विक्री व्यवस्थित होण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते.

सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा उत्पादकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा, आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनांनुसार शेती व फुलशेती करणाऱ्या स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ येत राहील, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.

कर्नाटक, तामिळनाडूतून फुलांची आवक

गेल्या दोन दिवसांपासून गोव्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू आदी भागांतून मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांची आवक झाली. गोव्याच्या विविध भागांमध्ये परराज्यांतून आणलेल्या झेंडूच्या फुलांची विक्री होत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे स्थानिक उत्पादकांनी फुलविलेल्या झेंडूच्या फुलांना विशेष मागणी मिळाली नाही, असे अनेक उत्पादकांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा
सर्व पहा