पणजी : गोव्यात राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मोफत गॅस सिलिंडर योजनेतील अर्जांमधील अटी आणि नियमांविषयी सामाजिक कार्यकर्ते सावियो कुतिन्हो यांनी गंभीर आक्षेप नोंदवत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत वर्षाला ३,००० रुपये मिळवण्यासाठी अर्जासोबत जोडण्यात येणाऱ्या स्वयं-घोषणापत्रातील (Declaration) अटींमुळे लाभार्थ्यांची दिशाभूल होण्याची मोठी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मडगाव पालिकेत गोवा उज्ज्वला योजनेचे अर्ज मिळवण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सावियो यांनी मध्यमांशी संवाद साधला.
कुतिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अर्जातील अटींनुसार अर्जदार व्यक्ती 'गृह आधार' किंवा 'दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेची' (DSS) लाभार्थी नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर एखाद्या नागरिकाने किंवा कुटुंबाने हे ३,००० रुपये मिळवण्यासाठी अटी न वाचता घोषणापत्रावर स्वाक्षरी केली, तर प्रशासकीय पडताळणीदरम्यान ही माहिती उघड होऊन त्यांची आधीपासून सुरू असलेली 'गृह आधार' किंवा 'डीएसएस' (ज्येष्ठ नागरिक पेन्शन) योजना रद्द केली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
'गृह आधार' किंवा 'डीएसएस' अंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला दरमहा नियमित आर्थिक मदत मिळते. मात्र, केवळ ३,००० रुपयांच्या वार्षिक लाभासाठी नागरिकांनी घाईघाईने स्वाक्षरी केल्यास ही दरमहा मिळणारी मदत बंद होऊन त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा कुटुंबप्रमुख आधीपासूनच या कल्याणकारी योजनांचे लाभार्थी असल्याने त्यांनी अर्ज भरण्यापूर्वी हे नियम काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही योजना आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच सरकारने आणली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागरिकांनी रांगा लावून फॉर्म भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या स्वयं-घोषणापत्रातील अटींवर अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. नियम न वाचता स्वाक्षरी केल्यास भविष्यात रकमेची वसुली (Recovery) होणे किंवा इतर शासकीय योजनांतून नाव बाद होणे यांसारख्या कायदेशीर व प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे नागरिकांनी पूर्ण विचारांतीच निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.


