नवी दिल्ली : डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी टोळ्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन चक्र-अंतर्गत सीबीआयने देशातील २० राज्यांमध्ये तब्बल ८९ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत फसवणुकीच्या पैशांची प्राप्ती, अफरातफर आणि हस्तांतरण करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तीन प्रकरणांत तब्बल ४२.३६ कोटींची फसवणूक
सीबीआयने हाती घेतलेल्या तीन डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये पीडितांना एक ते तीन महिन्यांपर्यंत डिजिटल अरेस्ट करून ठेवण्यात आले होते. या काळात आरोपींनी पीडितांकडून एकूण ४२.३६ कोटी रुपये उकळले.
बिट्स पिलानी प्रकरण : पीडिताला तीन महिने डिजिटल अरेस्ट करून ७.६७ कोटी रुपयांची फसवणूक.
गुजरात प्रकरण : पोलिस अधिकारी असल्याचे भासवत तीन महिने डिजिटल अरेस्ट करून १९.२४ कोटी रुपये उकळले.
कर्नाटक प्रकरण : एका महिन्याच्या डिजिटल अरेस्टनंतर पीडिताकडून १५.४५ कोटी रुपये लुटले.
बँक खाती आणि डिजिटल उपकरणांची तपासणी
फसवणुकीची रक्कम नेमकी कुठे आणि कोणाकडे वळवण्यात आली, या पैशांचे लाभार्थी आणि टोळीतील सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी सीबीआयने ही कारवाई केली. तपासादरम्यान बँकिंग कागदपत्रे, खात्यांशी संबंधित नोंदी, डिजिटल उपकरणे आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू
सीबीआय पथकांकडून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल आणि आर्थिक पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. त्यातून देशभरात कार्यरत असलेल्या डिजिटल अरेस्ट टोळ्यांचे आर्थिक आणि तांत्रिक जाळे उघड होण्याची शक्यता आहे.
फसवणुकीची रक्कम वळवणाऱ्या तिघांना अटक
कारवाईदरम्यान सीबीआयने आकाश, राजा कर्माकर आणि ज्योती राणी या तिघांना अटक केली. हरियाणातील आकाश याच्या बँक खात्यात फसवणुकीतील १.९५ कोटी रुपये जमा झाल्याचे तपासात समोर आले. त्याने ही रक्कम त्याच दिवशी इतर खात्यांमध्ये वळवल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
कोलकात्यातील राजा कर्माकर याच्या फर्मच्या खात्यात फसवणुकीतील १.५० कोटी रुपये जमा झाल्याचे आढळले. तर ज्योती राणी हिने फसवणुकीतील रकमेचा काही भाग रोख स्वरूपात काढून उर्वरित रक्कम इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
डिजिटल अरेस्ट टोळ्यांवर सीबीआयची नजरडिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये आरोपी पोलीस, सीबीआय किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरवतात. त्यानंतर व्हिडिओ कॉलवरून चौकशी किंवा अटक झाल्याचे सांगत मोठ्या रकमा हस्तांतरित करण्यासाठी दबाव आणला जातो.
सीबीआयने या प्रकरणांतील इतर आरोपी आणि संपूर्ण नेटवर्कचा शोध सुरू ठेवला आहे. जप्त केलेल्या बॅंकिंग आणि डिजिटल पुराव्यांच्या तपासातून या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी टोळीतील आणखी सदस्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


