गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वर्षागणिक घटत आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षापेक्षा तब्बल २ हजारांनी कमी झाली आहे. २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये १७,०२७ विद्यार्थी होते. यंदा २०२६-२७ मध्ये ही संख्या घटून १५,१६३ वर आली आहे.
विधानसभेत दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. मागील पाच वर्षांचा विचार केल्यास, यापूर्वी दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ५०० ते ६०० ने घटत होती. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. २०२२-२३ मध्ये सरकारी प्राथमिक शाळांमध्ये १९,४६७ विद्यार्थी होते. २०२३-२४ मध्ये ही संख्या घटून १८,८३७ झाली. २०२४-२५ मध्ये ती १७,८८०, तर २०२५-२६ मध्ये १७,०२७ वर आली. यंदा विद्यार्थ्यांची संख्या प्रथमच १५ हजारांच्या पातळीवर पोहोचली आहे.
विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सरकारकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासोबत मोफत पुस्तके, वह्या, रेनकोट तसेच गणवेश दिला जातो. प्राथमिक शाळांच्या इमारतींमध्येही सुधारणा करण्यात येत असून, स्मार्ट ब्लॅकबोर्डसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. लहान मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण देता यावे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही दिले जाते.


