७ सप्टेंबर रोजी साळावली १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प २४ तास बंद

दक्षिण गोव्यातील पाणीपुरवठ्यावर अंशतः परिणाम; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
04th September, 04:53 pm
७ सप्टेंबर रोजी साळावली १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प २४ तास बंद

मडगाव : शेळपे-सांगे येथील १०० एमएलडी साळावली जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम नव्याने उभारण्यात येणाऱ्या अतिरिक्त १०० एमएलडी प्रकल्पाशी जोडण्यासाठी आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या तांत्रिक कामासाठी सोमवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत दक्षिण गोव्यातील विविध क्षेत्रांमधील पाणीपुरवठा अंशतः प्रभावित होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे.

या २४ तासांच्या शटडाऊनमुळे सांगे तालुक्यातील नेत्रावळी, जांबावली, रिवण आणि सावर्डे येथील गुडेमळ, तसेच शिरोडा, केपे, बाळळी पंपिंग स्टेशन, गुडी, मडगाव शहर, फातोर्डा, राय, फत्तेपूर, हाणका, लोटली, कासावली, नागोवा-कुंकळ्ळी, कुडतरी आणि नुवे या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. याशिवाय कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को आणि मुरगाव मतदारसंघातील काही भागांमध्येही पाण्याचा दाब कमी राहण्याची किंवा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याच क्षेत्राला पाणीपुरवठा करणारा १६० एमएलडी क्षमतेचा मुख्य साळावली प्रकल्प नियमितपणे कार्यरत राहणार आहे. यामुळे पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प होणार नसला तरी, शटडाऊनमुळे काही भागांत पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होईल. विशेषतः कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को आणि मुरगाव मतदारसंघातील शेवटच्या टप्प्यातील (टेल-एंड) भागांमध्ये शटडाऊन संपल्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

या संभाव्य गैरसोयीची नोंद घेऊन नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा आणि आवश्यकतेनुसार पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता हर्षा व्ही. एस. काकोडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा