पेडणे : केरी-पेडणे येथील आजोबा मंदिराच्या मागील डोंगराळ परिसरात दोन बिबटे एकमेकांबरोबर खेळताना दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनखात्याने या घटनेची दखल घेतली असून संबंधित परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डोंगरावरील मोकळ्या व खडकाळ भागात दोन बिबटे वावरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर वेगाने प्रसारित झाल्यानंतर केरी व आसपासच्या परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली. विशेषतः डोंगरालगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये तसेच या परिसरातून ये-जा करणाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
पेडणे वन विभागाचे अधिकारी महाले यांनी दोन बिबट्यांच्या वावराच्या माहितीला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, नर आणि मादी असे दोन बिबटे या परिसरातील डोंगराळ व खडकाळ भागात वावरत आहेत.
बिबटे सध्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या परिसरात असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र ते लोकवस्तीच्या दिशेने आले किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले, तर वनखात्याकडून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे महाले यांनी स्पष्ट केले.
बिबटे दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर केवळ कुतूहलापोटी नागरिकांनी डोंगराळ भागात जाणे किंवा बिबट्यांचा व्हिडिओ-फोटो काढण्यासाठी जवळ जाण्याचा प्रयत्न करणे टाळणे आवश्यक आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी एकट्याने निर्जन किंवा झाडीच्या परिसरातून जाणे टाळावे. बिबटा लोकवस्तीत किंवा घरांच्या जवळ दिसल्यास वनखात्याला माहिती द्यावी.
सध्या वनखात्याचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, केरीतील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
वनखात्याचे अधिकारी परिसरात तैनात
घटनेची माहिती मिळताच वनखात्याचे अधिकारी अर्जुन शेडगावकर संबंधित परिसरात लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी विनाकारण भीती बाळगू नये मात्र डोंगराळ व झाडीच्या भागात जाताना सावधगिरी बाळगावी, अशा सूचना दिल्या आहेत.


