ढवळी येथील १४ भंगारअड्ड्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
3 hours ago
ढवळी येथील १४ भंगारअड्ड्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई

फोंडा : कवळे पंचायत क्षेत्रातील ढवळी येथे शुक्रवारी सकाळी सुमारे १४ भंगारअड्डे कडक पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर भंगारअड्डे पाडण्यात आले असून ५-६ वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी असलेले बेकायदेशीर भंगारअड्डे पाडण्यात आले होते. यावेळी पाडण्यात आलेले काही भंगारअड्डे जलवाहिनीवर कार्यरत असल्याचे दिसून आले.

ढवळी येथील जंक्शनजवळ असलेले बेकायदेशीर भंगारअड्डे पाडण्यात आले. त्यासाठी पंचायत मंडळ, पोलीस व अन्य अधिकारी परिसरात उपस्थित होते. बेकायदेशीर भंगारअड्डे काढण्यासाठी जानेवारी महिन्यात पंचायतीतर्फे नोटीस देण्यात आल्या होत्या. परंतु, कुणीच दखल घेतली नसल्याने शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व १४ भंगारअड्डे पाडण्यात आले. यावेळी काही जण अनेक परप्रांतीय लोकांना भाड्याच्या खोल्या उभारून दर महिन्याला भाडे घेत असल्याचे उघड झाले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी १४ बेकायदेशीर भंगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पंचायत कार्यालयात अनेक तक्रारी आल्या असल्याचे पंचायत सचिव खुशबू कामत यांनी सांगितले.

काही भंगारअड्डे जलवाहिनीवर कार्यरत : सरपंच नाईक

न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात सर्वांना नोटीस देण्यात आल्या होत्या. याठिकाणी असलेल्या लोकवस्तीविरोधात स्थानिक लोक पंचायतीकडे तक्रारी करीत होते. शुक्रवारी बेकायदेशीर भंगार अड्ड्यांवर कारवाई करण्याच्या वेळी पाण्याच्या मुख्य वाहिनीवर काही जणांनी बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले. पाण्याच्या वाहिनीवर उभारलेली बांधकामे पाडण्यात आली असून यापूर्वी सुद्धा बेकादेशीर भंगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली होती, असे सरपंच मनुजा नाईक यांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा