गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
भाजप गोवा मुख्यालयाचे उद्घाटन तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. शनिवारी रात्री ते गोव्यात दाखल होणार असून सोमवारी सायंकाळी ते दिल्लीला रवाना होणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधणार आहेत. दुपारी ४ वा. कदंब पठारावरील भाजप गोवा मुख्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सोमवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पश्चिम विभागीय परिषदेचे उद्घाटन होईल. या परिषदेला गोव्यासह महाराष्ट्र आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसेच इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. दमण आणि दीवचे अधिकारीही परिषदेला उपस्थित राहणार आहेत. सोमवारी दुपारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर गोवा पोलिसांना ‘प्रेसिडेंट कलर’ पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर सोमवारी सायंकाळी ते दिल्लीला रवाना होतील.
कदंब पठारावरील भाजप मुख्यालयात धार्मिक विधी यापूर्वीच पार पडले असले तरी मुख्यालयाचे औपचारिक उद्घाटन रविवारी होणार आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोवा भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


