शिक्षकांच्या बदलीविरोधात पेडणे, वाळपई, सांगेनंतर पणजीतही विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन; वर्गांवर बहिष्कार

पेडणे, वाळपई, सांगे आणि आता पणजीतही विद्यार्थ्यांनी वर्गांवर बहिष्कार टाकत रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत! ऐन परीक्षांच्या काळात अनुभवी शिक्षक बदलल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. दुसरीकडे शिक्षण खात्याने ७८ शिक्षकांच्या पदोन्नतीची माहिती दिली असून विस्थापित शिक्षकांसाठी 'ज्ञान पर्व योजना' आणली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांनी आंदोलनात उतरू नये, ३ वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी शिक्षकांची बदली होणार नाही असे स्पष्ट केले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
शिक्षकांच्या बदलीविरोधात पेडणे, वाळपई, सांगेनंतर पणजीतही विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन; वर्गांवर बहिष्कार

पणजी : शैक्षणिक वर्षाच्या ऐन मध्यावर आणि आगामी परीक्षा तोंडावर आल्या असताना शिक्षण खात्याने घेतलेल्या शिक्षकांच्या बदल्या व लेक्चर बेस्ड शिक्षकांच्या विस्थापनाच्या निर्णयावरून गोव्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले आहे. गेल्या चार दिवसांपासून पेडणे, वाळपई आणि सांगे येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाची झळ आता राजधानी पणजीतील टी. बी. कुन्हा उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत पोहोचली आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर ५ ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्या शिक्षकांची अचानक बदली करणे, कंत्राटी व तासिका तत्त्वावरील शिक्षकांना सेवेतून कमी करणे आणि हायस्कूलच्या शिक्षकांना उच्च माध्यमिक वर्गांवर पदोन्नती देण्याच्या धोरणावर विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी वर्गांवर बहिष्कार टाकत बालभवनाबाहेर निदर्शने केली.

या आंदोलनाची सुरुवात पेडणे येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातून झाली. तेथे तासिका तत्त्वावरील शिक्षकांना अचानक सेवेतून मुक्त केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. वाळपई विद्यालयातील ६ शिक्षकांची तडकाफडकी बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण संचालकांना निवेदन दिले, तर सांगे येथे पूर्वसूचना न देता शिक्षकांच्या बदल्या झाल्याने विद्यार्थ्यांनी शाळा आवारात आंदोलन सुरू केले. या घटनेची दखल घेत स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगे येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तर आज पणजीत टी. बी. कुन्हा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ८ हून अधिक कंत्राटी शिक्षकांना काढून टाकल्याचा आरोप करत न्यायाची मागणी लावून धरली आहे. ऑक्टोबरमध्ये प्रथम सत्र आणि डिसेंबरमध्ये पूर्व-बोर्ड परीक्षा असल्याने या अचानक बदलांमुळे अभ्यासक्रम कोलमडण्याची आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची भीती विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांच्या या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी प्रशासकीय व कायदेशीर बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९ सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये 'टीचर ग्रेड-१' या पदांसाठी ७८ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नियमांनुसार 'टीचर ग्रेड-१' ची ५० टक्के पदे पदोन्नतीने आणि ५० टक्के पदे थेट भरतीने भरली जातात, ज्यासाठी गोवा लोकसेवा आयोगाची (GPSC) शिफारस आवश्यक असते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने १५ ते २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पात्र हायस्कूल शिक्षकांना पदोन्नती देऊन पदस्थापित करण्यात आले आहे. या नियमित शिक्षकांच्या नियुक्तीमुळे पूर्वी रिक्त पदांवर कार्यरत असलेले काही तासिका शिक्षक विस्थापित झाले आहेत.

शिक्षण खात्याची भूमिका

विस्थापित झालेल्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या रोजगाराबाबत बोलताना शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी  'गोवा समग्र शिक्षा' अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री ज्ञान पर्व योजने'चा हवाला दिला. ज्या तासिका शिक्षकांकडे सरकारी शाळा किंवा उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ३ किंवा त्याहून अधिक वर्षांचा अनुभव आहे, त्यांना या योजनेद्वारे थेट सामावून घेतले जाणार आहे. यासाठी त्यांना कोणतीही नवीन मुलाखत देण्याची गरज नसून केवळ राज्य प्रकल्प संचालकांकडे अर्जासह अनुभवाचा दाखला सादर करावा लागेल. याशिवाय, समग्र शिक्षा अभियानांतर्गत पूर्व-प्राथमिक शाळांसाठी सुमारे ७५ शिक्षकांची पारदर्शक भरती प्रक्रिया सुरू असल्याचेही खात्याने स्पष्ट केले.

तासिका शिक्षकांच्या मानधनाबाबत स्पष्टीकरण देताना खात्याने सांगितले की, ३ वर्षांपर्यंत अनुभव असणाऱ्यांना २० हजार, ५ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना २५ हजार आणि १० वर्षे किंवा त्याहून अधिक अनुभव असणाऱ्यांना ३० हजार रुपये मानधन दिले जाते. कंत्राटी आणि तासिका सेवेत फरक असून १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी शिक्षकांच्या नियमितकरणाबाबत शासन स्तरावर विचार सुरू असला तरी अद्याप अंतिम नियमावली प्राप्त झालेली नाही. पदोन्नती मिळालेले सर्व शिक्षक पूर्णपणे पात्र असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असा दावा शिक्षण खात्याने केला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले ? 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या संपूर्ण प्रकरणावर ६५ व्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात भाष्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहन केले आहे. तीन वर्षे एकाच जागेवर कंत्राटी तत्त्वावर असलेल्या शिक्षकांची किंवा लेक्चररची बदली केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, काही शिक्षकांना पदोन्नती मिळाल्यानंतर नियमानुसार वरिष्ठ पदावर अन्यत्र जावेच लागते; अन्यथा त्यांना पदानुसार वेतन मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करू नये, काही समस्या किंवा शंका असल्यास थेट शिक्षण खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

याशिवाय शैक्षणिक उपक्रमांचा भाग म्हणून प्राथमिक स्तरावर संगणकाची ओळख व्हावी यासाठी प्रत्येक सरकारी प्राथमिक शाळेला किमान दोन टॅब दिले जातील आणि पुढील वर्षापासून शिक्षक दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये थेट प्रक्षेपित केला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर बाहेर येऊन त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयांमधील तासिका तत्त्वावरील (लेक्चर-बेस्ड) शिक्षकांची बदली न करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थांमध्ये नव्याने पदोन्नती मिळालेले शिक्षकही सेवेत कायम राहतील. विद्यार्थ्यांची आंदोलने समाप्त होतील याची खात्री करण्याचे निर्देश शिक्षण खात्याला देण्यात आले आहेत.

हेही वाचा
सर्व पहा