पणजी :केंद्रीय गृह खात्याने जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोवा, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत जनगणना पार पडणार आहे. त्यानंतर ५ ते ९ जानेवारी २०२७ दरम्यान पुनर्तपासणी फेरी होईल.
उत्तराखंडमध्ये बर्फाळ प्रदेश वगळता याच मुदतीत जनगणना होईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. या राज्यांव्यतिरिक्त इतर सर्व राज्यांमध्ये जनगणनेचा दुसरा टप्पा ९ ते २८ फेब्रुवारी २०२७ या काळात राबवला जाईल. यापूर्वी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ‘गृह जनगणना’ पूर्ण करण्यात आली आहे.
४० प्रश्नांची यादी
२०२७ च्या जनगणनेसाठीच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना ४० प्रश्न विचारले जाणार आहेत. २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत यावेळी १० अतिरिक्त प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नाव, लिंग, वय या मूलभूत माहितीसह राष्ट्रीयत्व, बँक खात्यांची संख्या, कोविड लस घेतल्याची जागा, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, पासपोर्ट क्रमांक, मतदार ओळखपत्र आणि आई-वडिलांची माहिती आदींचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष जनगणनेसह नागरिकांकडून विविध माहिती संकलित केली जाणार आहे. यामध्ये कुटुंबप्रमुखाशी नाते, सध्याची वैवाहिक स्थिती, लग्नावेळचे वय, जोडीदाराचे नाव, धर्म, जात (एससी/एसटी असल्यास), दिव्यांगत्व, मातृभाषा व इतर समजणाऱ्या भाषा, साक्षरता तसेच डिजिटल साक्षरतेची माहिती द्यावी लागेल. याशिवाय शिक्षण, मागील वर्षातील रोजगाराची स्थिती, व्यवसाय, जन्मस्थान, स्थलांतराचे कारण, कायमचा पत्ता आणि वाहन परवान्यासारखी माहितीही घेतली जाणार आहे. विवाहित, विधवा किंवा घटस्फोटित महिलांना जिवंत अपत्यांची माहिती देणे बंधनकारक असेल.
पहिल्या टप्प्यात काय प्रश्न विचारले?
यापूर्वी झालेल्या गृह जनगणनेच्या टप्प्यात घराच्या स्थितीविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. यात सांडपाणी व्यवस्था, स्नानगृहाची सोय, स्वयंपाकघर, एलपीजी जोडणी, इंधन तसेच रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टेलिफोन यांसारख्या सुविधांच्या उपलब्धतेविषयी माहिती संकलित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातही ऑनलाइन माहिती भरण्याची सोय उपलब्ध होती.
१ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ : प्रत्यक्ष जनगणना
५ ते ९ जानेवारी २०२७ : पुनर्तपासणी फेरी
१६ ते ३० नोव्हेंबर २०२६ : स्वयं-नोंदणीची (सेल्फ एन्युमरेशन) सुविधा
जनगणनेमुळे नगरपालिका निवडणुका लांबणार?
जनगणनेमुळे आता नगरपालिका निवडणुकांबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे कारण मिळाले आहे. डिसेंबरमध्ये जनगणना सुरू होणार असून ती जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर नगरपालिका निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाकडे करू शकते. येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंत नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.


