पणजी: उत्कृष्ट सेवेचा गौरव करण्यासाठी भारत सरकारतर्फे दिला जाणारा 'प्रेसिडेंट्स कलर्स' पुरस्कार गोवा पोलिसांना जाहीर झाला आहे. हा बहुमान गोवा राज्यासाठी आणि प्रत्येक गोमंतकीय नागरिकासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा उद्या, सोमवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर पार पडणार आहे. या विशेष राज्यस्तरीय सोहळ्याला देशाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचा ध्वज आणि सन्मानचिन्ह अधिकृतपणे सुपूर्द करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्टेडियमवर जाऊन सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली आहे.
आतापर्यंत देशातील केवळ १८ राज्यांच्या पोलीस दलांनाच हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे. गोवा हे भौगोलिकदृष्ट्या आकाराने लहान राज्य असूनही, शिस्तबद्ध कायदा-सुव्यवस्था राखण्यात आणि नागरिक केंद्रित सेवा पुरवण्यात दाखवलेल्या सातत्यामुळे 'प्रेसिडेंट्स कलर' मिळवणारे देशपातळीवरील १९ वे राज्य ठरले आहे. प्रशासकीय दृष्टिकोनातून ही बाब राज्याच्या शिरपेचातील मानबिंदू मानली जात आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना, विशेषतः युवा पिढी, एनसीसी (NCC), एनएसएस (NSS) स्वयंसेवक आणि संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमासाठी सुमारे २५०० प्रवेशपास उपलब्ध करण्यात आले असून, नागरिकांना जवळच्या पोलीस ठाण्यातून, माहिती व प्रसिद्धी संचालनालयाकडून किंवा मुख्यमंत्री कार्यालयातून (CMO) पास मिळवता येतील. स्टेडियममधील मर्यादित आसनक्षमतेमुळे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' दिले जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व उपस्थितांनी दुपारी २ वाजेपूर्वीच स्टेडियमवर उपस्थित राहावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.


