काँग्रेस-आरजी युतीची बोलणी अंतिम टप्प्यात; आपशीही सकारात्मक चर्चा सुरू: गिरीश चोडणकर

काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आरजीपीसोबतची युती अंतिम टप्प्यात असून आपशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, माजोर्डात सामाजिक कार्यकर्ते लिंडन मोन्तेरो यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
13 mins ago
काँग्रेस-आरजी युतीची बोलणी अंतिम टप्प्यात; आपशीही सकारात्मक चर्चा सुरू: गिरीश चोडणकर

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (GPCC) अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. रेव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी (RGP) सोबतच्या युतीबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आम आदमी पार्टीशीही (AAP) चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजोर्डा, काणसावली आणि वेळसाव लायन्स क्लबतर्फे क्विनी नगर येथे आयोजित रक्तदान शिबिरादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.



आगामी निवडणुकीत भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळणे आणि समविचारी पक्षांना एकत्र आणणे हा या राजकीय हालचालींचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच, काँग्रेस आणि आरजी पक्षाच्या नेत्यांची युतीविषयी चर्चा झाली होती. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, काँग्रेसचे विधिमंडळ नेते युरी आलेमाव, आरजीचे आमदार वीरेश बोरकर चर्चेत सहभागी झाले होते.

गिरीश चोडणकर यांनी नमूद केले की, राज्यातील जनतेची इच्छा आणि जनभावना लक्षात घेऊनच विरोधी पक्षांची ही आघाडी आकारास येत आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरुद्ध एकत्र येऊन मजबूत राजकीय पर्याय देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आरजीपीसोबतची चर्चा जवळपास पूर्ण केली असून, लवकरच याबाबत औपचारिक घोषणा केली जाईल. त्याचप्रमाणे, आप (AAP) सोबतही सकारात्मक चर्चा सुरू असून सर्व विरोधी शक्तींना एकाच व्यासपीठावर आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

माजोर्डा-वेळसाव परिसरात सामाजिक कार्यकर्ते लिंडन मोन्तेरो यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. आपण विविध राजकीय पक्षांशी संपर्कात असून भाजपव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षातर्फे ही निवडणूक लढवणार असल्याचे मोन्तेरो यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळाले आहे.

दरम्यान, आज क्विनी नगर येथील भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात अनेक नागरिक आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामाजिक कार्यकर्ते रॉकेझिन डि'सोझा यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, अपघातातील रुग्ण, गंभीर शस्त्रक्रिया आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी रक्त हे जीवनदायी ठरते. कृत्रिमरीत्या रक्ताची निर्मिती करता येत नसल्यामुळे अशा नियमित रक्तदान शिबिरांची अत्यंत गरज असते. त्यामुळे नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा
सर्व पहा