तारक आरोलकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

आसगाव जमीन गैरव्यवहार प्रकरण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
12 hours ago
तारक आरोलकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

म्हापसा : आसगाव येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी म्हापसाचा माजी नगरसेवक तारक आरोलकर याचा जामीन अर्ज म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सध्या आरोलकर हा कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे.

शनिवार, दि. ५ रोजी संशयित आरोपी आरोलकर याच्या जामीन अर्जावर निवाडा देत न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केला. यावेळी अर्जदाराच्यावतीने अॅड. एस. शेटगावकर, हस्तक्षेप अर्जदाराच्यावतीने अॅड. एस. सरदेसाई (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) आणि सरकारच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील पी. फडते तसेच तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमीन नाईक न्यायालयात उपस्थित होते.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने जामीन फेटाळून लावला. या आदेशाची प्रत तातडीने कोलवाळ कारागृह अधीक्षकांना पाठवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, फिर्यादी पंकज बजाज (रा. दिल्ली) यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा शाखेने दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी तारक आरोलकर विरुद्ध भा.दं.सं.चे कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८ व ४७१ अन्वये गुन्हा नोंद केला होता. यानंतर दि. १९ ऑगस्ट रोजी आरोलकर याला अटक केली. हा फसवणुकीचा प्रकार २ नोव्हेंबर २०२२ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडला होता. संशयित आरोपीने आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ३७/४ मधील जमिनीचे मालक व अधिकृत व्यक्ती असल्याचे भासवून आणि विश्वास संपादन करून जमिनीचा बनावट विक्रीकरार फिर्यादींना दाखवला. त्यानंतर जमीन खरेदीची आगाऊ ४० लाख रुपये रक्कम घेऊनही विक्री करारपत्र पूर्ण केले नाही आणि रक्कम परत केली नाही. नंतर सदर जमीन ही जोजफ मारियान डिसोझा उर्फ जुझे एम. डिसोझा यांच्या मालकीची असल्याचे उघड होताच फिर्यादींनी गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, फसवणूक तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.