म्हापसा : आसगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी तथा माजी नगरसेवक तारक आरोलकर याला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडीत असताना फिर्यादीशी फोनवरून संपर्क साधल्याच्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेने पोलीस कोठडीची मागणी केली होती.
पंकज बजाज यांच्या तक्रारीवरून ४० लाख रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखेने १९ ऑगस्ट रोजी आरोलकरला अटक केली होती. सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. दरम्यान, कोलवाळ कारागृहातून त्याने फिर्यादीशी फोनवरून संवाद साधून वाटाघाटीसाठी दबाव आणल्याचा प्रकार १ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोठडी
गुन्हे शाखेने हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी आरोलकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेने कारागृहातून केलेल्या फोन कॉलची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी वकील तेजस पवार यांनी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
४० लाखांच्या फसवणुकीचा आरोप
पंकज बजाज यांच्या तक्रारीवरून १७ ऑगस्ट रोजी आरोलकरविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रांप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ३७/४ मधील जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवून बनावट विक्रीकरार दाखवला आणि जमीन खरेदीसाठी ४० लाख रुपये आगाऊ घेतल्याचा आरोप आहे. मात्र, विक्री व्यवहार पूर्ण न करता रक्कमही परत केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नंतर सदर जमीन जोजफ मारियान डिसोझा ऊर्फ जुझे एम. डिसोझा यांच्या मालकीची असल्याचे समोर आल्यानंतर फसवणूक व बनावट कागदपत्रांप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.


