वाळपई : गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या पर्ये सत्तरी येथील कॅम्पसमधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार घडला. वसतिगृहातील खोलीत झोपलेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच हॉस्टेलमधील २६ वर्षीय विद्यार्थिनीने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी सुकन्या सब्बहानी (२६) हिला अटक केली आहे.
चाकून हल्ला केल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यात तक्रारदार विद्यार्थिनीच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या हातांवरही चाकूने वार झाल्याचे समोर आले आहे. हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जखमी विद्यार्थिनी ही लखनौ येथील रहिवासी असून ती शिक्षण घेत आहे. वसतिगृहातील आपल्या खोलीत झोपली असताना दुसऱ्या विद्यार्थिनीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपी सुकन्या सब्बहानी ही हैदराबाद येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलिसांनी तपास सुरू करून संशयित विद्यार्थिनीला ताब्यात घेतले आणि तिच्यावर अटकेची कारवाई केली. हल्ल्यामागील नेमके कारण काय, आरोपी व पीडित विद्यार्थिनीमध्ये पूर्वी काही वाद किंवा मतभेद होते का, तसेच हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू कुठून आणण्यात आला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
कॅम्पसमधील वसतिगृहातच विद्यार्थिनीवर अशाप्रकारे चाकूने हल्ला झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून घटनेशी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्यासह हल्ल्याच्या पार्श्वभूमीचा तपास केला जात आहे.
जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
हल्ल्यानंतर पीडित विद्यार्थिनीच्या गळ्याला गंभीर जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हल्ल्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात तिच्या हातांनाही दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हल्ल्यानंतर तिने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडित विद्यार्थिनीने तक्रारीत केला आहे.


