पणजी : युनायटेड किंगडमचा (यूके) नागरिक असल्याचे भासवून फेसबुकवर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत तिसवाडी तालुक्यातील ३४ वर्षीय महिलेची १८.५७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी करंझाळे येथे राहत असलेल्या एका ३४ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, एका व्यक्तीने फेसबुकवरून महिलेशी संपर्क साधला. त्याने स्वतःची ओळख विशाल चोप्रा अशी करून आपण युनायटेड किंगडम (युके)मध्ये राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने +९६६५७८२५२७१७ या व्हॉट्सअॅप क्रमांकाद्वारे तिच्याशी संवाद वाढवत मैत्री केली. तसेच लग्न करण्याची आश्वासन दिले. काही दिवसांनी संबंधित व्यक्तीने आपण गोव्यात आल्याची माहिती दिली.
त्यानंतर त्याने परदेशातून तिच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू कस्टमने जप्त केल्याचे खोटे सांगितले. सदर भेटवस्तूवर कस्टम ड्युटी भरणे आणि कस्टम विभागाशी संबंधित प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे बनावट कारण सांगून तक्रारदार महिलेचा विश्वास संपादन केला. कस्टमच्या त्रासातून सुटका करण्यासाठी व सामान सोडवण्यासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे भासवून त्याने तक्रारदार महिलेला विविध बँक खात्यात आणि ८२१९७४५०६६ आणि ९३६६११२७८४ या मोबाईलवर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सायबर विभागाने अज्ञात आरोपींविरुद्ध भा. न्या. संं.च्या ३१८(४), ३१९(२) आरडब्ल्यू ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


