पणजी : जुनी भारतीय नाणी मोठ्या रकमेला विकून देण्याचे खोटे आमिष दाखवत तिसवाडी तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिक महिलेची ८ लाख ५९ हजार ४१७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ताळगाव येथील एका ६३ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.१८ वा.च्या सुमारास तक्रारदार महिला फेसबुक वापरत असताना तिला जुनी नाणी बदलून देण्याबाबतची एक जाहिरात दिसली. त्यानुसार, तिने अधिक चौकशी केली असता, एका अज्ञात संशयिताने तिच्याशी संपर्क साधला. संशयिताने तक्रारदार महिलेला तिच्याजवळील जुनी भारतीय नाणी अत्यंत चांगल्या आणि भरघोस किमतीत विकून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तक्रारदार महिलेने संशयिताशी बोलणी सुरू केली. संशयिताने प्रक्रिया शुल्क, कर आणि इतर वेगवेगळ्या कारणांचे बहाणे सांगून तक्रारदार महिलेकडून टप्प्याटप्प्याने ८ लाख ५९ हजार ४१७ रुपये विविध खात्यांवर भरण्यास भाग पाडले. ठरल्याप्रमाणे संशयिताने तक्रारदाराची जुनी नाणी विकून दिली नाही. तसेच तिने जमा केलेली रक्कमही परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार महिलेने आॅनलाईन पद्धतीने गोवा पोलीस खात्याकडे तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पणजी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पेडणेकर पुढील तपास करीत आहे.


