अभिनेत्री नोरा फतेही विरुद्ध विमान कंपनीचा ३ कोटींचा मानहानीचा दावा

कंपनीवरील वक्तव्य भोवले; २५ सप्टेंबरला न्यायालयात सुनावणी; अभिनेत्री नोरा फतेही हिच्या अडचणीत वाढ झाली असून, एका चार्टर्ड विमान कंपनीने तिच्याविरोधात तब्बल ३ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. सोशल मीडियावर विमानाबाबत केलेल्या कथित अपमानास्पद आणि अवमानकारक वक्तव्यांमुळे कंपनीची प्रतिमा आणि व्यवसायाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी गांधीनगर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर. अग्रवाल यांच्या न्यायालयात होणार आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
अभिनेत्री नोरा फतेही विरुद्ध विमान कंपनीचा ३ कोटींचा मानहानीचा दावा

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही हिच्या अडचणीत वाढ झाली असून, एका चार्टर्ड विमान कंपनीने तिच्याविरोधात तब्बल ३ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. सोशल मीडियावर विमानाबाबत केलेल्या कथित अपमानास्पद आणि अवमानकारक वक्तव्यांमुळे कंपनीची प्रतिमा आणि व्यवसायाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी गांधीनगर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर. अग्रवाल यांच्या न्यायालयात होणार आहे.

गांधीनगर येथील न्यायालयात ‘ड्यून्स एव्हिएशन’ कंपनीने हा दिवाणी दावा दाखल केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई ते जयपूर प्रवासादरम्यान नोरा फतेही यांनी चार्टर्ड विमानातून काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओंमध्ये तिने विमानाला कथितरित्या ‘टॉय’ आणि ‘लेगो एरोप्लेन’ संबोधत त्याची खिल्ली उडवल्याचा कंपनीचा आरोप आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्याने व्यवसायावर परिणाम

नोरा फतेही यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिच्या या व्हिडिओंचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्याने कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे ‘ड्यून्स एव्हिएशन’ने न्यायालयात म्हटले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या प्रकरणानंतर त्यांच्या बुकिंगमध्ये १५ ते २० टक्क्यांची घट झाली असून, फ्लाइट रद्द होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली.

विमान असुरक्षित असल्याच्या दाव्याला कंपनीचा विरोध

नोरा फतेही यांनी विमानाच्या सुरक्षिततेबाबत केलेल्या कथित दाव्यांनाही कंपनीने विरोध केला आहे. मुंबई-जयपूर मार्गावर वापरण्यात आलेले ‘सेसना साइटेशन सीजेटी२’  हे विमान सर्व आवश्यक निकष पूर्ण करणारे असून, ते डीजीसिए (DGCA) प्रमाणित आणि उड्डाणासाठी योग्य असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच, आवश्यक परवानग्या आणि कायदेशीर नियमांचे पालन करूनच विमानाचे संचालन करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने नोरा फतेही यांच्यावर कोणतीही तांत्रिक माहिती किंवा तथ्य पडताळणी न करता विमानाबाबत बेजबाबदार आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे.

पोस्ट हटवून सार्वजनिक माफी मागण्याची मागणी

‘ड्यून्स एव्हिएशन’ने न्यायालयाकडे नोरा फतेही यांच्या सोशल मीडिया अकाउंट्ससह इंटरनेटवरील संबंधित पोस्ट आणि व्हिडिओ हटवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. तसेच, अभिनेत्रीने सार्वजनिकरीत्या स्पष्टीकरण देऊन माफी मागावी आणि कंपनीला झालेल्या नुकसानी पोटी ३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर. अग्रवाल यांच्या न्यायालयात होणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा