नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसच्या गणनेसाठी असलेली ७ हजारांची कमाल मर्यादा वाढवून २१ हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी नॅशनल कौन्सिल (स्टाफ साइड), जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने (NC-JCM) केंद्र सरकारकडे केली आहे. दसरा सण जवळ येत असल्याने २० ऑक्टोबर २०२६ पूर्वी याबाबत आदेश जारी करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीला तिप्पट बोनस मिळणार.
एनसी-जेसीएमचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव तथा नॅशनल कौन्सिलच्या अध्यक्षांना पत्र पाठवून ही मागणी केली. केंद्र सरकारने निश्चित केलेले किमान वेतन २१ हजार असल्याने कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनसही त्यापेक्षा कमी नसावा, असा युक्तिवाद या पत्रात करण्यात आला आहे.
सध्या बोनसाची गणना कशी होते?
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी सध्या ७ हजार रुपये किंवा केंद्र सरकारने निश्चित केलेले किमान वेतन, यापैकी जे अधिक असेल त्यावर गणना करण्याची तरतूद आहे. या गणनेनुसार ३० दिवसांच्या बोनससाठी सध्याच्या ७ हजारांच्या मर्यादेवर आधारित रक्कम सुमारे ६,९०८ इतकी होते.
एनसी-जेसीएमच्या मते, सध्याच्या वेतनमानाच्या तुलनेत ही रक्कम अत्यल्प आहे. त्यामुळे बोनसची गणना किमान २१ हजारांच्या वेतन मर्यादेवर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विविध श्रेणीतील किमान वेतन
केंद्र सरकारने विविध भौगोलिक क्षेत्रांसाठी कामगारांचे किमान दैनंदिन वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार :
अकुशल कामगार : ७८३ रुपये प्रतिदिन — सुमारे २०,३५८ रुपये प्रति महिना
अर्धकुशल कामगार : ८६८ रुपये प्रतिदिन — सुमारे २२,५६८ रुपये प्रति महिना
कुशल कामगार : ९५४ रुपये प्रतिदिन — सुमारे २४,८०४ रुपये प्रति महिना
अत्यंत कुशल कामगार : १,०३५ रुपये प्रतिदिन — सुमारे २६,९१० रुपये प्रति महिना
उत्तर प्रदेश आणि हरियाणासह काही राज्यांनीही ₹२१ हजार किमान वेतन निश्चित केले आहे.
२१ हजारांनुसार बोनस किती?
२१ हजार रुपयांच्या आधारावर ३० दिवसांच्या बोनसची गणना केल्यास रक्कम सध्याच्या ६,९०८ रुपयांपेक्षा लक्षणीय वाढू शकते. त्यामुळे एनसी-जेसीएमची मागणी मान्य झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बोनस रकमेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
एआयएनएसपीइएफची वेगळी गणना
दरम्यान, ऑल इंडिया न्यू पेन्शन स्कीम एम्प्लॉईज फेडरेशनने (AINSPEF) आठव्या वेतन आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनात आणखी वेगळी गणना मांडली आहे. विविध श्रेणीतील किमान वेतनाची सरासरी काढून ९१० रुपये प्रतिदिन किंवा २७,३०० रुपये प्रति महिना वेतन गृहीत धरावे, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
या आधारावर ३० दिवसांच्या बोनसची गणना केल्यास २६,९४१ रुपये बोनस मिळू शकतो, असा एआयएनएसपीइएफचीचा दावा आहे.
कर्मचाऱ्यांचे लक्ष दसऱ्याच्या आदेशाकडे
केंद्र सरकारने बोनससंदर्भातील सुधारित आदेश दसऱ्यापूर्वी जारी केल्यास त्याचा थेट फायदा पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे ७ हजारांची सध्याची मर्यादा कायम राहणार की २१ हजारांपर्यंत वाढणार, याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.


