नवी दिल्ली : रशियन सैन्यात भरती करण्यात आलेल्या २२७ भारतीय नागरिकांपैकी ५१ जणांचा मृत्यू झाला. १३९ जणांना सैन्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किर्गिस्तान दौऱ्यादरम्यान सोमवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मिस्री यांनी सांगितले की, रशियामध्ये अजूनही सैन्यात कार्यरत असलेल्या भारतीय नागरिकांची लवकरात लवकर सुटका करून त्यांना भारतात परत आणण्यासाठी रशियन सरकारशी सातत्याने चर्चा सुरू आहे. मॉस्को येथील भारतीय दूतावासही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
भारतीय नागरिकांची रशियन सैन्यातून सुटका हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या चर्चेदरम्यानही उपस्थित करण्यात आला आहे. भारताने यापूर्वीही रशियाकडे भारतीय नागरिकांना सैन्यातून मुक्त करून मायदेशी परत पाठवण्याची मागणी केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमांतून किंवा एजंटांच्या माध्यमातून काही भारतीय नागरिक रशियन सैन्यात दाखल झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून राजनैतिक पातळीवर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.


