‘ई २०’ पेट्रोलमुळे वाहने खराब झाल्यास सरकारने भरपाई द्यावी!

आमदार व्हेंझी व्हिएगस यांची मागणी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
6 hours ago
‘ई २०’ पेट्रोलमुळे वाहने खराब झाल्यास सरकारने भरपाई द्यावी!

पणजी : केंद्र सरकारने कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘ई २०’ मिश्रित पेट्रोलची विक्री सुरू केली आहे. पेट्रोल पंपावर असे पेट्रोल खरेदी करणे सक्तीचे केले आहे. या पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी झाले असून वाहनांचे भाग खराब होत आहेत. हे पेट्रोल २०२३ पूर्वीच्या वाहनांना अनुकूल नाही. या पेट्रोलमुळे वाहने खराब झाल्यास त्याची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली.

विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. व्हिएगस म्हणाले की, ई-२० पेट्रोलमुळे वाहनांना, विशेषतः २०२३ पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये कमी मायलेज, कार्यक्षमता कमी होणे, देखभाल खर्च वाढणे, वाहनांचे भाग खराब होणे यांचा समावेश आहे. टॅक्सी चालक आणि मोटारसायकल पायलटना देखील याचा त्रास होत आहे. सरकारने ग्राहकांना ई-२० सोबत शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच या पेट्रोलमुळे खराब झालेल्या वाहनांसाठी विमा योजना आणावी.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ई २० पेट्रोल विक्री हा केंद्राचा निर्णय आहे. निर्णय घेण्यापूर्वी विविध चाचण्या आणि शास्त्रीय अभ्यास करण्यात आला होता. अशा पेट्रोलमुळे वाहने खराब होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पेट्रोलमुळे वाहने खराब झाल्याची कोणतीही तक्रार केंद्र अथवा राज्य सरकारकडे आलेली नाही. राज्यातील १५७ पेट्रोल पंपांवर २०२५ पासून ई २० पेट्रोल विक्री सुरू झाली आहे. देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री २००६ पासूनच सुरू झाली होती. ब्राझील, युएसमध्येही अशा पेट्रोलची विक्री अनेक वर्षे सुरू आहे.

पेट्रोलची नियमित तपासणी करणार

ई २० पेट्रोलबाबत काही तक्रारी असल्यास त्या नागरी पुरवठा खात्याकडे द्याव्यात. खात्यातर्फे राज्यात विक्री होणाऱ्या पेट्रोलची नियमित लॅब चाचणी, तपासणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.