वास्को : येथील ऐतिहासिक श्री दामोदर मंदिरात तब्बल १७ वर्षांनंतर पारंपरिक ‘चंदन गंध पूजा’ भक्तिभावाने पार पडली. श्रावण महिन्यात पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही दुर्मीळ पूजा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल झाले होते.
‘गंध पूजे’मध्ये भगवान श्री दामोदरांच्या मूर्तीवर संपूर्णपणे चंदनाचा लेप लावला जातो. चंदनाचा हा लेप देवतेला शीतलता आणि प्रसन्नता प्रदान करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराचे पुजारी भूषण जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री दामोदर मंदिराला सुमारे १२८ वर्षांची परंपरा लाभली आहे. नुकताच मंदिराचा १२७ वा सप्ताह पार पडला. मंदिराच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीन वेळाच ‘चंदन गंध पूजा’ करण्यात आली आहे.
या पूजेची पहिली सुरुवात १९९१ मध्ये मंदिराचे तत्कालीन पुजारी आणि भूषण जोशी यांचे वडील कै. रमेश जोशी यांनी केली होती. त्यानंतर २००९ मध्ये तब्बल १८ वर्षांच्या अंतराने पुन्हा ही पूजा करण्यात आली.
आता पुन्हा १७ वर्षांच्या खंडानंतर ही धार्मिक परंपरा जिवंत करण्यात आली. यावेळी पुजारी भूषण जोशी यांनी प्रथमच स्वतःच्या हस्ते ‘चंदन गंध पूजा’ केली. त्यामुळे या पूजेला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी लघुरुद्र हवन, नवग्रह पूजा आणि श्री सत्यनारायण पूजा यांचेही आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक विधींमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भगवान श्री दामोदरांचे आशीर्वाद घेतले.
१७ वर्षांनंतर झालेल्या या दुर्मीळ पूजेमुळे वास्कोतील श्री दामोदर मंदिराची जुनी धार्मिक परंपरा पुन्हा उजळून निघाली, तसेच मंदिराचा वास्कोवासीयांशी असलेला श्रद्धेचा आणि आध्यात्मिकतेचा दीर्घ संबंधही अधोरेखित झाला.


