करमळी: उडुपी ते ठाणे असा रेल्वे प्रवास करणाऱ्या एका कुटुंबातील दीड वर्षाच्या बालिकेला अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे करमळी रेल्वे स्थानकावर तातडीने वैद्यकीय मदत मिळवावी लागली. या घटनेदरम्यान १०८ आपत्कालीन ॲम्ब्युलन्स सेवेकडून वेळेवर प्रतिसाद न मिळाल्याने आणि नंतर खाजगी रुग्णालयातून रुग्णाला वाहून नेण्यास नकार दिल्याने १०८ सेवेच्या नियमावलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रवासादरम्यान बालिकेची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच पालकांनी करमळी रेल्वे स्थानक कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक संपर्कांना माहिती दिली. परिस्थितीत गांभीर्य ओळखून एका स्थानिक टॅक्सी चालकाच्या मदतीने अवघ्या १० मिनिटांत बाळरोग तज्ज्ञांना स्थानकावर पाचारण करण्यात आले. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने १०८ ॲम्ब्युलन्सला तात्काळ फोन करण्यात आला, परंतु रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने अखेर खाजगी टॅक्सीचा वापर करून तिला जवळच्या हेल्थवे (Healthway) खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी वैद्यकीय उपचारांना प्राधान्य देत तातडीने उपचार सुरू केले.
दरम्यान, पुढील उपचारांचा खर्च परवडणारा नसल्याने पालकांनी मुलीला सरकारी रुग्णालयात (गोवा मेडिकल कॉलेज) हलवण्याचा निर्णय घेतला. यासाठी पुन्हा १०८ ॲम्ब्युलन्स सेवेशी संपर्क साधण्यात आला असता, 'प्रोटोकॉल'चे कारण देत खाजगी रुग्णालयातून रुग्ण वाहून नेण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. अखेर संबंधित खाजगी रुग्णालयाने स्वतःची रुग्णवाहिका, डॉक्टर आणि नर्स उपलब्ध करून दिल्याने बालिकेला सुरक्षितपणे सरकारी रुग्णालयात हलवणे शक्य झाले. शुक्रवारी उपचारांनंतर बालिकेला डिस्चार्ज देण्यात आला असून तिने कुटुंबासह ठाण्याकडे पुढील प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा केवळ सरकारी रुग्णालयांपुरती किंवा विशिष्ट नियमांपुरती मर्यादित न ठेवता, खाजगी रुग्णालयांतील आणीबाणीच्या प्रसंगीही सर्व नागरिकांना समान रीतीने उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. 'प्रोटोकॉल'च्या तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही रुग्णाला आपत्कालीन सेवेपासून वंचित ठेवू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी १०८ सेवेच्या नियमावलीत तातडीने सुधारणा करावी, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


