हॉटेलविक्रीच्या व्यवहारातून नायक यांच्यावर गोळीबाराचा संशय

मुंबईतील व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर : चोरीच्या पल्सरमुळे तपासात अडथळा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th August, 11:11 pm
हॉटेलविक्रीच्या व्यवहारातून नायक यांच्यावर गोळीबाराचा संशय

पणजीतील एका हॉटेल विक्रीच्या वादातून मुंबईतील व्यावसायिकाशी बिनसल्यानेच आपल्यावर गोळीबार झाला असावा, अशी शंका मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांनी व्यक्त केली आहे. या संशयाच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याची पाळेमुळे शोधण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी गुन्ह्यात चोरीच्या पल्सर मोटारसायकलचा वापर केल्याचा संशय असल्याने वाहनाच्या मूळ मालकाचा शोध घेताना पोलिसांच्या तपासात अडथळे निर्माण झाले आहेत.

पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोच्या बाहेर शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेला ४८ तासांहून अधिक काळ उलटून गेला असला, तरी अद्याप पोलिसांना संशयितांचा ठोस सुगावा लागलेला नाही.

दोन अज्ञात हल्लेखोरांनी श्रीनिवास नायक यांच्यावर थेट तीन राऊंड फायर केले. यावेळी नायक यांच्या वैयक्तिक सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखून प्रत्युत्तरादाखल तीन राऊंड फायर केले. त्यामुळे हल्लेखोरांनी घटनास्थळावरून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून विरुद्ध दिशेला पळ काढला.

गोळीबारामागे व्यावसायिक वादाचा संशयपणजीतील एका हॉटेलच्या विक्री व्यवहारातून मुंबईतील एका व्यावसायिकाशी वाद झाल्यामुळेच आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा, अशी शंका श्रीनिवास नायक यांनी पोलिसांसमोर व्यक्त केली आहे. या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी गोवा पोलिसांनी मुंबई कनेक्शनची चौकशी सुरू केली आहे.

हल्लेखोरांकडून चोरीच्या पल्सरचा वापर?

मोटारसायकलचा क्रमांक बनावट

१) हल्ला झालेल्या ठिकाणी पोलिसांना एक पल्सर मोटारसायकल सापडली होती. तिच्या नोंदणी क्रमांकाची तपासणी केली असता, तो क्रमांक बनावट असल्याचे उघड झाले.

२) त्या क्रमांकाच्या मूळ मालकाने स्वतःची पल्सर विक्रीसाठी ‘ओएलएक्स’वर जाहिरात केल्याचेही तपासात समोर आले. त्यामुळे घटनास्थळी सापडलेली मोटारसायकल चोरीची असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

३) पोलिसांनी मोटारसायकलचा चेसीस क्रमांक वाहतूक खात्याला पाठवून मूळ मालकाची माहिती मागवली आहे.

हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी हॉटेलमधील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. गोळीबाराचा प्रकार खंडणी किंवा व्यावसायिक स्पर्धेशी निगडित असू शकतो, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

मुंबई कनेक्शनचा शोध

गोवा पोलिसांचे पथक मुंबईत

श्रीनिवास नायक यांनी दिलेल्या जबाबातील संशयाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत, उपनिरीक्षक परेश सिनारी आणि इतरांचे पथक मुंबईला रवाना करण्यात आले आहे. संशयित व्यावसायिक सध्या कोठडीत असल्याची माहिती समोर आली असून, त्याची चौकशी केल्यानंतरच नायक यांनी व्यक्त केलेल्या संशयातील तथ्य स्पष्ट होणार आहे.

उत्तर भारतातील टोळ्यांचाही तपास

हल्लेखोरांची वेशभूषा उत्तर भारतातील खंडणीखोर टोळ्यांशी साधर्म्य दर्शवत असल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांनी वापरलेली मोटारसायकल, सीसीटीव्ही फुटेज, श्रीनिवास नायक यांचा जबाब आणि मुंबईतील व्यावसायिकाशी संबंधित तपशील यांची सांगड घालून तपास पुढे नेला जात आहे.

४८ तासांनंतरही आरोपींचा ठोस सुगावा नाहीघटनेला दोन दिवसांहून अधिक काळ उलटूनही हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. चोरीची मोटारसायकल, बनावट क्रमांक आणि व्यावसायिक वादाचा संभाव्य धागा यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
हेही वाचा
सर्व पहा