पणजी: पर्वरी येथील निओ मॅजिस्टिक कॅसिनोच्या बाहेर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेला आता ४० तासांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र, तरीही या प्रकरणी पोलिसांना संशयित आरोपींचा कोणताही ठोस सुगावा लावण्यात अद्याप यश आलेले नाही. मॅजिस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी थेट तीन राऊंड फायर केले. या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर श्रीनिवास नायक यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखून प्रत्युत्तरादाखल तीन राऊंड फायर केले, ज्यामुळे हल्लेखोरांनी घाबरून घटनास्थळावरून तत्काळ पळ काढला. गोळीबार केल्यानंतर हे दोन्ही हल्लेखोर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून विरुद्ध दिशेला पळाले; त्यातील एक जण डाव्या तर दुसरा उजव्या बाजूने पसार झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर आणि पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही दुर्घटना ज्या ठिकाणी घडली, त्या ठिकाणापासून अवघ्या १०० मीटरच्या अंतरावर पर्वरी पोलीस स्थानक आहे. इतकेच नव्हे तर अवघ्या ५०० ते ७०० मीटरच्या अंतरावर गोवा विधानसभा संकुल आणि गोवास्थित मुंबई उच्च न्यायालय यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील संस्था आहेत. अशा क्षेत्रात घडलेल्या या गुन्ह्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सखोल पाहणीतून हे दोन्ही हल्लेखोर गेल्या दोन-तीन दिवसांपासून या परिसरात येऊन रेकी करत असल्याचे स्पष्ट संकेत पोलिसांना मिळाले आहेत.
राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी लवकरच दोषींना गजाआड केले जाईल असे स्पष्ट केले असले, तरी प्रत्यक्षात ४० तास उलटूनही आरोपींना बेड्या ठोकण्यात अपयश आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ताज्या माहितीनुसार, गृह खाते आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असून, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य संशयितांच्या शोधासाठी विशेष तपास पथके मुंबईसाठी रवाना करण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.


