पणजी : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुलाच्या कंपनीकडे गोव्यात ६ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संशयितांनी तक्रारदार कंपनी 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' (HOABL) कडून ४१ लाख रुपये वसूलही केले आहेत. ही कंपनी तेथे 'वन गोवा' प्रकल्पावर काम करत आहे. तक्रारीनुसार, संशयितांनी प्रकल्प बंद पाडण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती.
अखेर एका व्हॉट्सॲप कॉलच्या डिजिटल रेकॉर्डिंगमुळे या खंडणीखोरांचा पर्दाफाश झाला. त्यानंतर एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला व काल सायंकाळी उशिरा मुंबईतील चर्चगेट अँटी एक्स्टॉर्शन सेलचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या पथकाने सिद्धेश जना तारी आणि प्रितेश साळगावकर यांना दोडामार्गातून अटक केली.
प्रकल्प ठप्प करण्याची धमकी
पोलीस अहवालानुसार, हे प्रकरण डिचोली तालुक्यातील कारापूर गावात सुरू असलेल्या 'वन गोवा' गृहप्रकल्पाशी संबंधित आहे. कंपनीचे संपर्क अधिकारी (Liaisoning Officer) भूषण रमेश पाटील (३९) यांनी सांगितले की, प्रकल्पाचे काम कायदेशीर आणि सर्व आवश्यक सरकारी मंजुरीनुसार सुरू होते. यादरम्यान एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात स्थानिक रहिवासी सिद्धेश जना तारी आणि प्रितेश साळगावकर जबरदस्तीने प्रकल्प परिसरात शिरले. त्यांनी साईटवर उपस्थित अधिकाऱ्यांना धमकावले.
स्थानिक ग्रामस्थांच्या आंदोलनाआडून हलवली सूत्रे
आरोपींनी प्रकल्प बंद पाडण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधाचा आसरा घेतला. आंदोलनाचा खरा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असल्याचा दावा त्यांनी केला. जर कंपनीला शांततेत काम चालवायचे असेल, तर त्याची किंमत मोजावी लागेल, असे त्यांनी बजावले. अधिकाऱ्यांनी कायदेशीर नियमांचा हवाला दिला असता, संशयितांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली आणि काम थांबवण्याच्या बदल्यात ६ कोटींची खंडणी मागितली. यानंतर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून सिद्धेश तारी याने ३४ लाख रुपये आणि प्रितेश साळगावकर याने ७ लाख रुपये उकळले.
व्हॉट्सॲप कॉलमुळे उघडकीस आले प्रकरण
पैशांची मागणी करण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी प्रितेश साळगावकर याने कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप कॉल करून १० लाखांची मागणी केली. या व्हॉट्सॲप कॉलचे रेकॉर्डिंग अधिकाऱ्यांनी पुरावा म्हणून पोलिसांना सोपवले. त्यानंतर मुंबईच्या चर्चगेट पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली आहे.
बातमी अपडेट होत आहे.


