पणजी : मेरशी जंक्शनजवळ १०८ आपत्कालीन रुग्णवाहिकेचा स्वयंअपघात झाला. यात रुग्णवाहिकेत तैनात असलेले वैद्यकीय कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जीएमसी हलवण्यात आले आहे.

सदर १०८ रुग्णवाहिका कदंब पठारावरील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी निघाली होती. रुग्णवाहिका उड्डाणपुलाजवळ पोहोचली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा स्वयंअपघात घडला. सुदैवाने अपघाताच्या वेळी रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नव्हता, ज्यामुळे मोठी अघटित घटना टळली आहे.

घटनेची माहिती मिळताच जुने गोवे पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जुने गोवे पोलीस ठाण्याचे हवालदार दिनेश मुळगावकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून रीतसर पंचनामा केला. अपघातग्रस्त रुग्णवाहिकेमुळे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी जुने गोवे पोलीस पुढील तपास करत आहेत.


