गोवा पोलिसांना अमित शहांच्या हस्ते मिळणार ‘प्रेसिडेंट्स कलर’ सन्मान : मुख्यमंत्री

गोवा पोलिसांना मानाचा ‘प्रेसिडेंट्स कलर’ सन्मान जाहीर झाला आहे. ७ सप्टेंबर रोजी शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते गोवा पोलीस दलाला हा सन्मान दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. या सन्मानानिमित्त काढण्यात आलेल्या ‘पोलीस प्राइड राईड’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक आलोक कुमार, पोलीस महानिरीक्षक के. आर. चौरासिया व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
गोवा पोलिसांना अमित शहांच्या हस्ते मिळणार ‘प्रेसिडेंट्स कलर’ सन्मान :  मुख्यमंत्री

पणजी : गोवा पोलिसांना मानाचा ‘प्रेसिडेंट्स कलर’ सन्मान जाहीर झाला आहे. ७ सप्टेंबर रोजी शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते गोवा पोलीस दलाला हा सन्मान दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. या सन्मानानिमित्त काढण्यात आलेल्या ‘पोलीस प्राइड राईड’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक आलोक कुमार, पोलीस महानिरीक्षक के. आर. चौरासिया व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ १५ राज्यांना असा सन्मान मिळाला आहे. गोव्यासारख्या लहान राज्याला असा सन्मान मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस खाते शिस्तबद्ध पद्धतीने आणि समर्पणाने काम करत आहे याची ही पावती आहे. पोलीस प्राइड रॅली पुढील ६ दिवस राज्यातील विविध तालुक्यातून फिरणार आहे. सर्वसामान्य जनतेला पोलिसांना मिळालेला या मोठ्या सन्मानाची माहिती मिळावी यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये पोलीस खात्याच्या कामकाजाबाबत जागृती देखील करण्यात येईल. 

मुख्यमंत्री म्हणाले, मागील काही वर्षे आम्ही पोलीस दलाला अद्ययावत करत आहोत. दलाला आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञान पुरवण्यात येत आहे. खात्यातील सायबर फॉरेन्सिक विभागाला नवीन उपकरणे दिली जात आहेत. यापुढे देखील खात्याच्या आधुनिकीकरणाचे काम सुरूच राहील. गोवा पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी यापुढेही असेच काम करत राहतील. 

अमित शहा यांच्या कार्यक्रमाचे पास ४ सप्टेंबर नंतर पोलीस मुख्यालय तसेच सर्व पोलीस स्थानकात उपलब्ध होणार आहेत. इच्छुकांनी याबाबत संबंधित पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधावा. 

पर्वरी गोळीबारप्रकरणी गोव्यात आणि गोव्याबाहेर तपास : आलोक कुमार 

पर्वरी गोळीबार प्रकरणी गोव्यात आणि गोव्याबाहेर तपास सुरू आहे. याबाबत आताच अधिक माहिती देता येणार नाही. विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरक्षा वाढवण्यात आल्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.

गोळीबार प्रकरणाचा तपास योग्य दिशेने : मुख्यमंत्री  

मुख्यमंत्री म्हणाले की, पर्वरी गोळीबार प्रकरणी गोवा पोलीस योग्य तपास करत आहेत. थोड्याच दिवसात याचा सोक्षमोक्ष लागेल. आरोपींना पकडून घटनेच्या मुळापर्यंत जाऊ अशी आम्हाला खात्री आहे.

हेही वाचा
सर्व पहा